Gulabrao Patil : “आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेले असते”
आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेले असता असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. राज्यात २१ जूनला शिवसेनेत उभी फूट […]
ADVERTISEMENT

आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेले असता असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. राज्यात २१ जूनला शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेतले ४० आमदार यांनी बंड केलं. त्यानंतर काय घडलं हे महाराष्ट्राला ठाऊक आहेच. तिकडे चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार फुटणार असा दावा केला असतानाच गुलाबराव पाटील यांनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल असं म्हणाले की ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं वाईट आहे. पक्ष सोडणं गैर नाही वगैरे.. आम्ही पक्ष सोडलेलाच नाही असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या टीकेलाही उत्तर दिलं. आम्ही मूळ शिवसेना आहोत. बोर्डावर पक्षाचं नावही तेच आहे. आम्ही भाजपमधे गेलेलो नाही. आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नावही मिळालं आहे आणि ढाल-तलवार हे चिन्हही मिळालं आहे. आम्ही पक्षांतर केलेलं नाही जे पक्षांतर करत असतील त्यांच्यासाठी अजित पवार बोलले असतील असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.
जयंत पाटील यांच्या दाव्यावरही उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीतलं शिबीर झालं की शिंदे फडणवीस सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यालाही गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन संपलं आहे, पण आम्ही सरकार कोसळण्याची वाट पाहतो आहोत. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहावा, आमदार फुटू नयेत म्हणून अशा पद्धतीची वक्तव्यं केली जातात. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल यात काहीही शंका नाही असंही गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.