एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातच पडणार खिंडार? महेश शिंदे म्हणाले, ‘जेवत्या ताटावरून उठवलं गेलं, ते…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-इम्तियाज मुजावर, सातारा

राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, असं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी गेल्या आठवड्यात केलं होतं. त्यामुळे सरकारच्या अस्थिरतेबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात आता एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातच शिंदे गटातील दोन आमदारांमधील धुसफूस समोर आलीये. आमदार महेश शिंदे यांनी बोलता बोलता बरीच खदखद व्यक्त केल्यानं साताऱ्यातून शिंदेंला खिंडार पडू शकते, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झालीये.

उद्धव ठाकरेंना आव्हान देत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि भाजपच्या साथीनं सरकारही स्थापन केलं. सरकार स्थापनेला 100 दिवस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समर्थक आमदारांसह गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे आशीर्वाद घेतले. आता आम्ही सत्तेतून हटत नाही, असा नारा सत्तेतील आमदार देत असतानाच सातारा जिल्ह्यातून शिंदे गटातल्या नाराजीचीच बातमी आलीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोरेगावचे आमदार महेश शिंदे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर नाराज असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून साताऱ्यात सुरुये. याचं कारण सांगितलं जातंय महेश शिंदे यांना पालकमंत्री शंभुराज देसाई हवी तेवढी ताकद देत नसल्याचं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातच शिंदे गटात नाराजीचा स्फोट होऊन गटाला गळती लागू शकते, अशा शक्यता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जाणकारांकडून व्यक्त केली जाऊ लागलीये.

शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्यात धुसफूस?

सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे या दोघांनी जिल्ह्यात शिंदे गटाला ताकद देत गट वाढवण्यास मोठा हातभार लावला आहे. मात्र, अलिकडच्या काही दिवसात दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू असल्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

ADVERTISEMENT

याबाबत आमदार महेश शिंदे यांना विचारले असता ‘माझी शंभूराज देसाई यांच्यावर कोणतीही नाराजी नाही’, असं त्यांनी सांगितलं. पण, पुढे बोलताना महेश शिंदे म्हणाले, ‘अपेक्षा तर प्रत्येकालाच असते. ज्याचं नशीब असतं, त्यालाच मिळतं. मी माझं काम करत राहतोय, याचा रिझल्ट मला शंभर टक्के मिळणार याची खात्री आहे.’

महेश शिंदेंनी शंभूराज देसाईंबद्दलची नाराजी थेट व्यक्त केली नसली, तरी माध्यमांशी बोलताना त्यांची अस्वस्थता जाणवली.

ADVERTISEMENT

शिंदे गटात अस्वस्थ कोण झालंय? महेश शिंदेंनी काय सांगितलं?

शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याच्या प्रश्नावर महेश शिंदे थेट बोलणं टाळलं. मात्र, त्यांच्या विधानाने शक्यतांना वाव दिलाय. शिंदे म्हणाले, ‘काय झालं. अस्वस्थ कोण झालेत… जे जेवत्या ताटावरून उठवले गेलेत ना, ते अस्वस्थ झालेत. ताट भरलेली होती. त्या ताटावरून एका झटक्यात बाजूला सारलं. आता शांतपणे 40 आमदार बसलेले आहेत’, असं भाष्य करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री असलेले आणि शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले अस्वस्थ असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलंय. मात्र, यावर सावरासारव करताना मला तरी कुणीही अस्वस्थ असल्याचं जाणवलं नाही, असंही शिंदेंनी म्हटलंय.

सातारा जिल्ह्यातील शिंदे गटातील पदाधिकारी काय म्हणताहेत?

आमदार महेश शिंदे हे आक्रमक स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, साताऱ्यात काम करत असताना पालकमंत्र्यांचा हवा तेवढा सपोर्ट मिळत नसल्याने महेश शिंदे नाराज असल्याच्या चर्चा शिंदे गटात दबक्या आवाजात सुरु आहे. जर ही नाराजी जास्त काळ टिकली, तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिल्ह्यातच गट फुटण्याची चिन्हे निर्माण होतील, असं शिंदे गटातील पदाधिकारी खासगीत बोलताना सांगत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT