MVA: कसब्याच्या निकालाने महाविकास आघाडी मजबूत केली? भाजपचं टेन्शन वाढणार!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mahavikas Aghadi, Maharashtra Politics: दोन जागांवर पोटनिवडणूक झाली, एक कसबा पेठ आणि दुसरी चिंचवड. मात्र, चर्चा होतेय ती कसबा पेठ पोटनिवडणूक निकालाची. या निकालाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असले, तरी महाविकास आघाडीला भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी स्पष्ट मेसेज निकालाने दिला. या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या भूमिका या एकत्र राहण्याच्याच असल्याच्या समोर आल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी कायम राहिली तर भाजप प्रणित युतीची डोकेदुखी वाढू शकते, असं राजकीय विश्लेषक म्हणताहेत.

ADVERTISEMENT

लोकसभा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहणार?

कसबा पेठचा निकाल लागण्यापूर्वी तिन्ही पक्षातून स्वबळांची विधानं केली जात होती. मात्र, निकालानंतर तिन्ही पक्षाच्या भूमिका महाविकास आघाडी असायला हवी, अशा बनल्या आहेत.

शरद पवार महाविकास आघाडीबद्दल काय म्हणाले?

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी महाविकास आघाडी राहायला हवी, अशीच भूमिका मांडली. ते म्हणाले, “माझा एक प्रयत्न राहणार आहे की, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकत्रित या निवडणुकीला सामोर जाणं याची काळजी घेतली जाईल. मी आता महाराष्ट्रात बघतोय की, लोकांना बदल हवाय. महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, त्या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. काँग्रेसचे नेते त्यात आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील काम करणारे, राष्ट्रवादीचे सहकारी आहेत, काही छोटे पक्ष आहेत. या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत”,

हे वाचलं का?

Exclusive: कसब्यात भाजपचा पराभव म्हणजे सगळं संपलं नाही: श्रीकांत भारतीय

शरद पवार असंही म्हणाले की, “मी महाराष्ट्रात फिरतोय, तिथे लोक आम्हाला सांगतात की आम्हाला बदल हवा आहे. आम्हाला बदलासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं, ही भावना लोकांमध्ये आहे आणि हे मी सगळीकडे… साताऱ्यात होतो, कराडला होतो… कर्जतला होतो… जामखेडला होतो. नगर जिल्ह्यात होतो. नाशिकला होतो. सगळीकडे हे ऐकतोय. महाराष्ट्रात पाहिले तर लोकांना बदल हवाय. त्यामुळे उद्याची विधानसभा आणि लोकसभेसंदर्भात महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेणे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे.”

ADVERTISEMENT

सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा की महाविकास आघाडी घडवण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची आहे. आता शरद पवारच महाविकास आघाडी कायम ठेवणार यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम असणार हे जवळपास निश्चित दिसत आहे.

ADVERTISEMENT

तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून जाणार महाराष्ट्रात

कसबा निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रितपणे महाराष्ट्रात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आता महाराष्ट्रात मेळावे घेणार आहे. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईंनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कायम राहावी अशीच भूमिका शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्यातरी दिसतेय.

महाविकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असे मेळावे होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या मेळाव्यांना शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे तीन पक्षातील मुख्य नेते उपस्थित राहणार आहे.

कसब्यातल्या मतदारांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा येऊ!’

काँग्रेसचं महाविकास आघाडीबद्दल काय?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाचं बोलत आहेत. मात्र, काँग्रेसमधील काही नेत्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याबद्दल आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही अशीच भूमिका मांडली आहे. “कसबा निवडणुकीत तब्बल 32 वर्षे ताब्यात असलेल्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीघा प्रयोग यशस्वी झाला आहे.नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे”, असं ते म्हणाले. त्यामुळे काँग्रेसमधील सूरही महाविकास आघाडीच्या बाजूनेच असल्याचं दिसत आहे.

महाविकास आघाडी भाजप-युतीसाठी आव्हान?

कसबा निवडणुकीत महाविकास आघाडी यशस्वी झाली. कसब्याप्रमाणेच आगामी काळातील निवडणुकीत महाविकास आघाडीने रणनीती ठेवली, तर भाजप-शिवसेना युतीसाठी आव्हान ठरू शकेल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. निवडणुकांना सामोर जाताना महाविकास आघाडीने चिंचवडप्रमाणे चुका टाळल्या, तर यश मिळू शकतं, अशीही चर्चा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं होतं आहे. दुसरीकडे गेल्या काही वर्षात भाजपत प्रचंड इनकमिंग झालं आहे. निवडणुका लढवणाऱ्या इच्छुकांची संख्याही वाढली आहे. अशात भाजपसमोरही बंडखोऱ्या होण्याचं आव्हान आहे. त्यामुळे भाजपलाही याकडे वेळीच लक्ष द्यावं लागेल, असंही राजकीय विश्लेषकांचं मतं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT