ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत वाद, लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं – आनंद परांजपे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात महाविकास आघाडीत एकत्र असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर मात्र आपापसात कोणत्या न कोणत्या कारणावरुन भांडतानाच दिसत आहेत. ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटातून नाराजी व्यक्त करण्यात येते आहे.

ADVERTISEMENT

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत घडलेल्या घटनेबद्दल ठाणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जर उग्र भूमिका घेतली तर जबाबदारी आमची राहणार नाही अशीही भूमिका घेतली आहे.

ठाण्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनीही लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना करत असलेल्या बॅनरबाजीवरुन टोलेबाजी केली आहे. “पालिका प्रशासन लसीकरण करत असताना खारेगावात शिवसेनेकडून पोस्टरबाजी केली जात आहे. आता लसी बनवण्याचं काम शिवसेनेने सुरु केलंय का? महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनामार्फत हे लसीकरण सुरु आहे. त्यामुळे याचं श्रेय हे फक्त शिवसेनेचं नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचं आहे”, अशा शब्दांत परांजपे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

यावेळी बोलत असताना आनंद परांजपे यांनी जिथे-जिथे पालिकेकडून लसीकरण होत आहे तिकडे शिवसेना पोस्टरबाजी करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा हे आता शिवसैनिक होणार आहेत का असा प्रश्न विचारत परांजपेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यामुळे स्थानिक शिवसेना नेते आता या आरोपांचं कसं उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT