महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही; राणेंचा संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर प्रहार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. राज्यावरील वीज टंचाईचं संकट, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडींवरून राणेंनी शिवसेनेला उलट सवाल केले. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नसल्याचं मला वाटतं, असंही राणे यावेळी म्हणाले. माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, “महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू आहेत. उत्सव सुरू आहे. स्वागत सुरू […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. राज्यावरील वीज टंचाईचं संकट, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडींवरून राणेंनी शिवसेनेला उलट सवाल केले. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नसल्याचं मला वाटतं, असंही राणे यावेळी म्हणाले.
माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, “महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू आहेत. उत्सव सुरू आहे. स्वागत सुरू आहे. स्वागत आणि उत्सव ज्या कारणासाठी होतोय, ते ऐकून आणि पाहून महाराष्ट्र कुठे चाललाय असा प्रश्न जनतेला पडत असेल. महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक मुख्यमंत्री काम करतात. याला आताच सरकार अपवाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कमाई करावी. पैसा मिळवावा म्हणून या सरकारमधील काही मंडळी प्रयत्न करत आहेत,” अशी टीका नारायण राणेंनी केली.
“काल दोन दिवसाच्या पत्रकार परिषदेच्या बातम्या मी पाहिल्या. पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी विचार मांडले, ते पाहता महाराष्ट्राची किंवा देशाची या प्रकारे पत्रकार परिषदेत भाषा वापरली. शिव्या घातल्या. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. संपादक पदावरील व्यक्तीने ज्या शिव्या घातल्या त्या मी उच्चारू इच्छित नाही. ज्या शिव्या घातल्या त्यावरून त्या माणसाचंच नाही, तर त्या वृत्तपत्राचा दर्जा काय असेल, काय आहे हे जनतेला माहिती आहे,” असं म्हणत राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
“पत्रकारितेचं पावित्र्य सामना ठेवतो की नाही माहिती नाही. पत्रकारिता पेशा आहे धंदा नाही. किरीट सोमय्यांना सामनातून चोर म्हटलं आहे. धमकी न देता, धमकीच्या केसेस महाराष्ट्रात घेतल्या जात आहे. चाळीस बसेस सोडून कोणती जनता रस्त्यावर उरली होती. शिवसेना कुणाला घाबरत नाही म्हणता, पण तुम्ही कधी शिवसैनिक होतात. संपादक म्हणून आलात. ईडी स्वतंत्र आहे. ते त्यांचं काम करत आहेत. भ्रमिष्ट झालेली माणसं अशी बोलतात. तसाच प्रकार संजय राऊतांचा आहे. आपण कोणत्या पक्षात आहोत. पक्षाचे संस्थापक कोण होते. त्यांचे विचार काय होते? माध्यमांचा टीआरपी वाढतोय, पण शिवसेनेचा टीआरपी खाली जातोय. याचं कारण संजय राऊत,” असंही राणे यावेळी म्हणाले.









