मराठा आरक्षण: इकडे मनोज जरांगेंचं उपोषण, तिकडे समृद्धी हायवे जाम.. काय सुरूय?
एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना दुसरीकडे जालन्यात मात्र समृद्धी महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला आहे. पाहा नेमकं काय घडतंय जालन्यात.
ADVERTISEMENT
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र होत असून जालना जिल्ह्यातील नाव्हा परिसरात समृद्धी महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
नाव्हा येथे मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि आंदोलक एकत्र आले होते. यावेळी "एक मराठा, लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचं" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक रोखून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह इतर प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, या मागण्यांसाठी पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. सरकारने दिलेली आश्वासने पूर्णपणे पाळली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.









