पुणे: 'दारू घेतली अन् सकाळी गेला...', मृतांच्या नातलगांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश...
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यामध्ये विषारी गावठी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वाढत असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथे सात जणांचा मृत्यू झाला असून काही जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे आणि परिसरातील विविध भागांतील मृतांची एकूण संख्या 15 वर पोहोचली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. "आमच्या कुटुंबातील व्यक्ती गेल्या, पण यापुढे इतर कुटुंबांवर अशी वेळ येऊ नये. पुढची पिढी निर्व्यसनी ठेवायची असेल तर अशा दारूच्या गुत्यांवर कायमस्वरूपी कारवाई झाली पाहिजे," अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.
घटनेनंतर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विषारी दारूचा पुरवठा नेमका कुठून झाला, ती कोणी तयार केली आणि विक्रीचे जाळे किती मोठे आहे याचा तपास सुरू आहे. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असून दारूचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.









