पवारांची मोदींसोबत भेट डॅमेज कंट्रोलसाठी, BJP-NCP युती शक्य नाही – प्रवीण दरेकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. सुमारे २० ते २५ मिनीटं झालेल्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात केंद्रीय तपासयंत्रणांकडून सरकारमधील नेत्यांवर होत असलेली कारवाई आणि इतर प्रश्नांवर चर्चा झाल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांमध्ये भाजप-राष्ट्रवादी युतीच्या चर्चांना उधाण आलं.

परंतू विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावत शरद पवार यांची आजची भेट ही डॅमेज कंट्रोलसाठी असू शकेल असा अंदाज वर्तवला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीची शक्यता नाही. पवारांना एका दिशेला जायचं असेल तर ते दुसरीकडे अंगुली निर्देश करतात. संजय राऊत हे शिवसेनेपेक्षा पवार साहेबांचे एकनिष्ठ आहेत. त्यामुळं सहयोगी नेत्यावर कारवाई झाल्यानंतर, त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही भेट घेतली असल्याची शक्यता आहे”, असा मार्मिक टोला दरेकरांनी लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान आले असता प्रवीण दरेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. “सध्या आघाडीचे नेते एकापाठोपाठ एक जेल मध्ये चालले आहेत, ईडीचं धाडसत्र सुरु आहे. त्यामुळं तपास यंत्रणांचा ससेमिरा आपल्या मागे लागू नये, यासाठी ही भेट असू शकते. डॅमेज कंट्रोल करण्यात शरद पवार माहीर आहेत आणि संजय राऊत हे शिवसेनेपेक्षा पवारांच्या अधिक जवळचे आहेत. त्यामुळं राऊत यांना दिलासा देण्यासाठी पवारांनी मोदींची भेट घेतली असेल”. ही भेट झाली असली तरीही एकाही भ्रष्टाचार्‍याला सोडणार नाही, असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी केल्याचं म्हणत आमदार दरेकर यांनी राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT