PM Modi : ‘त्या कमतरतांवर मात करण्याचा प्रयत्न करेन’; पंतप्रधान मोदींचं संपूर्ण भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यांचं संपूर्ण भाषण जसंच्या तसं… लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात श्री सरस्वत्यै नमः वाणी परंपरेच्या पवित्र आयोजनात आमच्यासोबत उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी जी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यांचं संपूर्ण भाषण जसंच्या तसं…
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात
श्री सरस्वत्यै नमः
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाणी परंपरेच्या पवित्र आयोजनात आमच्यासोबत उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी जी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र सरकारमधले मंत्री श्री सुभाष देसाई जी, आदरणीय उषा जी, आशा जी, आदिनाथ मंगेशकर जी, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचे सर्व सदस्यगण, संगीत आणि कला जगतातले सर्व विशेष सहकारी, इतर सर्व मान्यवर, महिला आणि पुरुष, या महत्त्वाच्या आयोजनात आदरणीय हृदयनाथ मंगेशकर यांना देखील यायचे होते, पण आताच आदिनाथ जी यांनी सांगितले की त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. ते लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो.
मित्रांनो,
ADVERTISEMENT
मी स्वतःला या ठिकाणी बोलण्यासाठी एक योग्य वक्ता आहे असे मानत नाही कारण संगीतासारख्या अतिशय गहन विषयातला जाणकार तर मी अजिबातच नाही. पण सांस्कृतिक आकलनातून मला असे जाणवते की संगीत ही एक साधना देखील आहे आणि भावना देखील आहे. जे अव्यक्ताला व्यक्त करतात, ते शब्द आहेत. जे व्यक्तमध्ये उर्जेचा चेतनेचा संचार घडवतो तो नाद आहे आणि जे चेतनेमध्ये भाव आणि भावना भरते, त्याला सृष्टी आणि संवेदनेच्या परमसीमेपर्यंत पोहोचवते ते संगीत आहे. तुम्ही निश्चल बसलेला असलात तरी संगीताच्या एका स्वरामुळे तुमच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू शकते. हे सामर्थ्य आहे. पण संगीताचा स्वर तुमच्यात वैराग्याची भावना देखील निर्माण करू शकतो, संगीतामुळे तुमच्यात वीररस निर्माण होतो, संगीत मातृत्व आणि ममतेची अनुभूती देऊ शकते.
ADVERTISEMENT
संगीत तुम्हाला देशभक्ती आणि कर्तव्याच्या जाणीवेच्या शिखरावर पोहोचवू शकते. आपण सर्व अतिशय भाग्यवान आहोत कारण आपल्याला संगीताच्या या सामर्थ्याला या शक्तीला लतादीदींच्या रुपात प्रत्यक्ष पाहता आले आहे. आपल्याला आपल्या डोळ्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे. आणि मंगेशकर कुटुंब, त्यांच्या पिढ्यान पिढ्या या यज्ञात आपली आहुती देत राहिले आहे. आणि माझ्यासाठी तर हा अनुभव यापेक्षा खूपच जास्त मोठा राहिला आहे.
आताच हरीशजींनी काही प्रमुख घटनांची माहिती दिली पण मी विचार करत होतो की दीदींसोबत माझे नाते कधीपासूनचे आणि किती जुने आहे. खूप मागे जाता जाता असे आठवू लागते होते की कदाचित चार साडेचार दशके उलटून गेली असतील. सुधीर फडकेजींनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत या कुटुंबासोबत अपार स्नेह, अगणित घटना आहेत, ज्या माझ्या जीवनाचा एक भाग बनल्या आहेत. माझ्यासाठी लतादीदी सूरसम्राज्ञीबरोबरच आणि जे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो की त्या माझ्या मोठ्या भगिनी होत्या. अनेक पिढ्यांना प्रेम आणि भावना यांची भेट देणाऱ्या लतादीदींकडून नेहमीच मला मोठ्या बहिणीचे अपार प्रेम मिळाले आहे. मला असे वाटते, यापेक्षा आयुष्यात दुसरे मोठे भाग्य काय असू शकते?
अनेक दशकानंतर पहिल्यांदाच यावेळी रक्षाबंधनाचा सण जेव्हा येईल त्या वेळी दीदी नसतील. सामान्यतः एखाद्या सत्कार समारंभात जायचे असेल आणि आता हरीशजी पण सांगत होते, एखादा सत्कार स्वीकारायचा तर, मी जरा या विषयापासून लांबच राहिलो आहे. मला स्वतःला जुळवून घेता येत नाही. पण जर पुरस्कार लता दीदींसारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने असेल तर माझ्यासाठी त्यांची आपुलकी आणि मंगेशकर कुटुंबाचा माझ्यावर जो अधिकार आहे त्यामुळे या ठिकाणी येणे हे एका प्रकारे माझे दायित्व बनते. आणि हे त्या प्रेमाचे प्रतीक आहे आणि ज्यावेळी आदिनाथजींचा संदेश आला त्यावेळी मी, माझे किती कार्यक्रम आहेत, मी किती व्यग्र आहे याचा कशाचाच मी विचार करत राहिलो नाही, मी सांगितलं की तुम्ही सरळ होकार देऊन टाका. नाही म्हणणे मला शक्यच होणार नाही. हा पुरस्कार मी सर्व देशवासियांना समर्पित करत आहे.
ज्या प्रकारे लतादीदी देशातील प्रत्येक व्यक्तीच्या होत्या त्याच प्रकारे त्यांच्या नावाने मला दिला गेलेला हा पुरस्कार प्रत्येक व्यक्तीचा आहे. लतादीदींबरोबर नेहमीच माझे बोलणे होत असायचे. त्या स्वतःहून देखील आपले संदेश आणि आशीर्वाद पाठवत रहायच्या. त्यांची एक गोष्ट कदाचित आपल्या सर्वांसाठी उपयोगी ठरू शकते. जी गोष्ट मी विसरू शकत नाही. मी त्यांचा खूपच आदर करत होतो. पण त्या काय म्हणायच्या, त्या नेहमी म्हणत असत की माणूस त्याच्या वयामुळे नाही तर त्याच्या कार्यामुळे मोठा होत असतो. जी व्यक्ती देशासाठी काही चांगले कार्य करते ती व्यक्ती अधिकच महान असते. यशाच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीच्या महान विचारसरणीची अशी जाणीव आपल्याला होत असते.
लतादीदी वयाने देखील मोठ्या होत्या आणि कर्तुत्वाने देखील मोठ्या होत्या. आपण सर्वांनी जितका वेळ त्यांच्यासोबत घालविला आहे त्यातून आपणा सर्वांना हे माहित झाले आहे की लतादीदी सरलतेची प्रतिमूर्ती होत्या. त्यांनी संगीतक्षेत्रात असे स्थान मिळविले की लोक त्यांना सरस्वतीमातेचे प्रतिरूप मानत. त्यांच्या आवाजाने सुमारे ऐंशी वर्षे संगीत क्षेत्रावर स्वतःचा ठसा उमटविला होता. ग्रामोफोनच्या जमान्यापासून कॅसेट्स, नंतरच्या काळात सीडीज्, डीव्हीडीज मग पेन ड्राईव्हज, ऑनलाईन संगीत अशा माध्यमांतून आणि मग विविध संगीतविषयक अॅप्स पर्यंत, संगीताशी संबंधित माध्यमांचा आणि जगाचा किती मोठा प्रवास लताजींच्या आवाजाच्या साक्षीने होत आला आहे.
चित्रपट सृष्टीच्या चार-पाच पिढ्यांना लताजींनी त्यांचा आवाज दिला. ‘भारतरत्न’ सारख्या सर्वोच्च पुरस्काराने देशाने त्यांचा सन्मान केला आणि त्यातून देश स्वतःच गौरवान्वित झाला. संपूर्ण विश्व त्यांना सूरसम्राज्ञी म्हणत असे पण त्या स्वतःला सुरांची सम्राज्ञी नव्हे तर सुरांची साधक मानत असत. मी कितीतरी लोकांकडून ऐकले आहे की त्या जेव्हा एखाद्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जात असत तेव्हा त्या त्यांची पादत्राणे रेकॉर्डिंग स्टुडीओच्या बाहेर काढून मग आत प्रवेश करत असत. त्यांच्यासाठी संगीताची साधना आणि ईश्वराची साधना ह्या दोन्ही गोष्टी एकच होत्या.
मित्रांनो,
आदिशंकर यांच्या अद्वैताच्या सिद्धांताला आपण ऐकून, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण गोंधळून जातो. पण मी जेव्हा आदिशंकरांच्या या सिद्धांताला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि सोप्या शब्दात जर तो सिद्धांत मांडायचा प्रयत्न केला तर मी असे म्हणेन की ईश्वराचे नाव उच्चारण्याची क्रिया देखील स्वराशिवाय अपूर्ण आहे. ईश्वरातच स्वर सामावलेला आहे. जिथे स्वर आहे तेथेच पूर्णत्व आहे. संगीत आपल्या हृदयावर, आपल्या अंतर्मनावर परिणाम करते, जर त्याचा उगम लताजींसारख्या पवित्र व्यक्तीकडून झाला असेल तर ते पावित्र्य आणि ती भावना देखील त्या संगीतात मिसळून गेलेले असतात. लताजींच्या व्यक्तिमत्त्वाचा हा भाग आपणा सर्वांसाठी आणि विशेष करून युवा पिढीसाठी एक प्रेरणेचा स्त्रोत आहे.
मित्रांनो,
लताजींच्या या भूतलावरील दैहिक प्रवासाचा समारोप अशा वेळी झाला जेव्हा आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यांनी स्वातंत्र्य पूर्व काळापासून भारतात त्यांच्या आवाजाची मोहिनी घालायला सुरुवात केली. आणि हा 75 वर्षांचा प्रवास त्यांच्या सुरांच्या साक्षीनेच झाला. या पुरस्कारासोबत, लताजींचे तीर्थरूप दिनानाथ मंगेशकर यांचे देखील नाव जोडले गेले आहे. संपूर्ण मंगेशकर परिवाराने देशासाठी दिलेल्या योगदानासाठी आपण सर्व देशवासीय सदैव त्यांचे ऋणी राहू.
संगीताच्या बरोबरच राष्ट्रभक्तीची जी प्रेरणा लता दिदींमध्ये होती त्याचा स्त्रोत त्यांचे तीर्थरुपच होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात, दीनानाथजींनी सिमला येथे ब्रिटीश व्हॉईसरॉयच्या कार्यक्रमात वीर सावरकरांनी लिहिलेले गीत सादर केले होते. ब्रिटीश व्हॉईसरॉय यांच्या समोर हे दीनानाथजीच करू शकतात. आणि त्यांनी त्या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन देखील लावलं होतं. वीर सावरकरांनी हे गीत इंग्रज सरकारला आव्हान देण्यासाठी लिहिलं होतं. हे साहस, ही देशभक्ती, दीनानाथजींनी आपल्या कुटुंबाला वारशात दिली होती.
कदाचित लताजींनी कुठेतरी एकदा सांगितलं होतं, की आधी त्यांना समाजाची सेवा करायची होती. लताजींनी संगीत हीच आपली उपासना बनविली. मात्र राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रसेवा यांची प्रेरणा त्यांच्या गीतांतून देखील आपल्याला मिळत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांवर वीर सावरकरांनी लिहिलेलं गीत ‘हिंदू नृसिंहा’ असो, अथवा, समर्थ गुरु रामदासजींच्या रचना असतो, लताजींनी शिवकल्याण राजाच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ते अमर केले आहे. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ आणि ‘जय हिंद की सेना’ या त्या भावनांच्या ओळी आहेत, ज्या त्यांनी देशांच्या प्रत्येक नागरिकाच्या ओठांवर अमर केल्या आहेत. त्यांच्या आयुष्याशी संबंधित अशा कितीतरी गोष्टी आहेत. लतादीदी आणि त्यांच्या कुटुंबाला देखील अमृत महोत्सवात आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे.
मित्रांनो,
आज देश ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. लताजी, एक भारत श्रेष्ठ भारताच्या सूरेल प्रतीकाप्रमाणे होत्या. आपण बघा, त्यांनी देशातल्या तीस पेक्षा जास्त भाषांमधून हजारो गाणी गायली. हिंदी असो, मराठी असो संस्कृत असो किंवा इतर भारतीय भाषा असोत. लताजींचा स्वर सगळ्या भाषांत एकसारखा मिसळलेला आहे. त्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या मनात त्या घर करून आहेत. भारतीयत्व जपत संगीत कसं अजरामर होऊ शकतं, हे त्यांनी त्यांच्या जगण्यातून दाखवून दिलं आहे. त्यांनी भगवदगीतेचे देखील स्वर पठण केले. आणि तुलसी, मीरा, संत ज्ञानेश्वर आणि नरसी मेहतांच्या गीतांना देखील समाजाच्या मनाशी एकरूप केलं.
रामचरित मानसच्या श्लोकांपासून बापूंचे प्रिय भजन, ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’, सर्व काही लताजींच्या आवाजानं पुनर्जीवित झाले. त्यांनी तिरुपती देवस्थानसाठी गीत आणि मंत्रांचा एक सेट रेकॉर्ड केला होता. जो आज देखील तिथं वाजवला जातो. म्हणजे, संस्कृतीपासून ते श्रद्धेपर्यंत, पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लताजींच्या सुरांनी देशाला एका सूत्रात ओवण्याचे काम केले. जगात देखील त्या आपल्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या. तसंच त्याचं वैयक्तिक जीवन देखील होतं. पुण्यात त्यांनी आपली कमाई आणि मित्रांच्या सहकार्यानं मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभं केलं, जे आजही, गरिबांची सेवा करत आहे. आणि देशात कदाचित फार कमी लोकांना हे माहित असेल, कोरोना काळात देशात गरिबांसाठी काम करणारी जी मोजकी रुग्णालये होती, त्यात पुण्याच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं नाव होतं.
मित्रांनो,
आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश आपल्या भूतकाळाचे स्मरण करत आहे, आणि देश भविष्यासाठी नवे संकल्प करत आहे. आपण जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टीमपैकी एक आहोत. आज भारत, प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेनं पुढे जात आहे. विकासाची ही यात्रा, आपल्या संकल्पांचा एक भाग आहे. मात्र, विकासाविषयी भारताचा मौलिक दृष्टीकोन नेहमीच वेगळा राहिला आहे. आमच्यासाठी विकासाचा अर्थ आहे, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’. सर्वांसोबत आणि सर्वांसाठी विकासाच्या भावनेत ‘वसुधैव कुटुंबकमची’ भावना देखील अंतर्भूत आहे.
संपूर्ण जगाचा विकास, संपूर्ण मानवजातीचे कल्याण हे केवळ भौतिक सामर्थ्याने साध्य केले जाऊ शकत नाही. त्यासाठी मानवीय मूल्ये गरजेची असतात, अध्यात्मिक चेतना गरजेची असते. म्हणूनच आज भारत जगाला योग आणि आयुर्वेदापासून पर्यावरण संरक्षणासारख्या विषयांवर दिशा दाखवत आहे. मला असं वाटतं, भारताच्या या योगदानाचा एक महत्वपूर्ण हिस्सा आपले भारतीय संगीत देखील आहे. ही जबाबदारी आपल्या हातात आहे. आपण आपला हा वारसा त्याच मूल्यांसह जिवंत ठेवायला हवा आणि पुढे न्यायला हवा आणि विश्वशांतीचे एक माध्यम बनवावे.
ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मला पूर्ण विश्वास आहे संगीत जगताशी संबंधित आपण सर्वजण ही जबाबदारी पार पाडाल, आणि एका नव्या भारताला दिशा द्याल. याच विश्वासासह मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो, मंगेशकर कुटुंबाचे देखील मी मनापासून आभार मानतो, आपण दीदींच्या नावाने या पहिल्या पुरस्कारासाठी माझी निवड केली. पण हरीशजी जेव्हा मानपत्र वाचत होते, माझ्या मनात असा विचार आला, हे मला अनेकदा वाचावे लागेल. आणि वाचून मला नोंदी काढाव्या लागतील की अजून यातील मला काय काय आणि किती किती मिळवायचं आहे, अजूनही माझ्यात किती कमतरता आहेत, त्या मी कशा पूर्ण करू शकतो. दीदींच्या आशीर्वादाने आणि मंगेशकर कुटुंबाच्या प्रेमाने माझ्यात ज्या कमतरता आहेत, त्या कमतरता आज मला मानपत्राद्वारे देण्यात आल्या आहेत, मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करेन,
खूप खूप धन्यवाद !
ADVERTISEMENT