बच्चू कडूंचीही राजकारणात घराणेशाही; भावाचं पॅनल निवडणुकीत
अमरावती : ‘प्रहार’चे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना राजकारणात संघर्ष करुन उभा राहिलेला नेता म्हणून ओळखलं जातं. अनेकदा त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली आहे. मात्र आता कडू यांच्याकडूनही घराणेशाहीला सुरुवात झाली आहे का? असा सवाल विचारला जात आहे. बेलोरा ग्रामपंचयत निवडणुकीत बच्चू कडू यांचे भाऊ भैय्या कडू यांनी पॅनल उभं केलं असून ते […]
ADVERTISEMENT

अमरावती : ‘प्रहार’चे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना राजकारणात संघर्ष करुन उभा राहिलेला नेता म्हणून ओळखलं जातं. अनेकदा त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली आहे. मात्र आता कडू यांच्याकडूनही घराणेशाहीला सुरुवात झाली आहे का? असा सवाल विचारला जात आहे. बेलोरा ग्रामपंचयत निवडणुकीत बच्चू कडू यांचे भाऊ भैय्या कडू यांनी पॅनल उभं केलं असून ते स्वतः सरपंचपदासाठी निवडणूक लढवित आहेत.
बच्चू कडू यांचे बेलोरा हे मूळगाव. याच ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचे भाऊ रिंगणात उतरले आहेत. एकूण १३ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये प्रहारचे ५ सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ८ जागांसाठी १७ जण रिंगणात आहेत. तर सरपंच पदासाठी दोघं जण रिंगणात आहेत. यात भैय्या कडू आणि त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या पाठिंब्यावर परिवर्तन पॅनलचे दत्ता उर्फ रामेश्वर विधाते उभे आहेत.
याबाबत विधाते यांनी सांगितलं की, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे. अनेक वर्षांपासून गावात आमदारांची सत्ता आहे. पण बरीचशी काम रखडली आहेत. गावात लोकांना पाणी मिळत नाही. पाणंद रस्ते अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. शाळेतील रिक्त पद भरलेली नाहीत. गावात दवाखाना नाही, ही सर्व काम पूर्ण करण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे.
तर भैय्या कडू यांच्या दाव्यानुसार, मी भाऊंचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. गावकऱ्यांनी ही निवडणूक लढण्यास सांगितलं आणि भाऊंच्या परवानगीनंतर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. गावच्या विकासासाठी आम्ही सतत तत्पर आहोत. या बळावरच आम्ही निवडणूक जिंकू, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भैय्या कडू यांना पराभूत करण्यासाठी गावात काँग्रेसच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी आणि भाजपही एकत्र आले आहेत.