संभाजीनगरच्या उरावर आधुनिक रझाकार आणि ‘सजा’कार दोन्ही येऊन बसलेत : राज ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने आज राज्यात शिवसेनेत ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद रंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता झेंडावंदनाचा कार्यक्रम ठरला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी 7 वाजताच येऊन झेंडावंदन केल्याने शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच याचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिकाणी झेंडावंदन केले त्याच ठिकाणी नंतर जाऊन अभिवादन केले.

ADVERTISEMENT

दरम्यान मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. राज ठाकरे यांनी एक पत्र सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. यात शिवसेना आणि एमआयएमवर टीका केली आहे. संभाजीनगरकरांच्या उरावर ‘सजा’कार पण येऊन बसलेत असे म्हणत शिवसेनेवर जहरी टीका केली. तर, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा सणासारखा साजरा होत नसल्याबद्दल खंतही व्यक्त केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

सस्नेह जय महाराष्ट्र!

हे वाचलं का?

आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस. आजचा दिवस खरं तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाला हैद्राबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हवं होतं आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.

मला असं एक नेहमी वाटतं, ह्या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं ह्या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या, मग पुढे नरहर कुरुंदकरांची ह्या विषयावरची व्याख्यानं युट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की ह्या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही.

ADVERTISEMENT

माझं तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठयपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये.

ADVERTISEMENT

पण मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं बोललं का जात नसेल? अर्थात ‘रझाकारांचं’ लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं, त्यामुळे हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या ह्याच रझाकारांची पुढची औलाद, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते, आणि दुर्दैव असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे.

बरं, संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक ‘सजा’कार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून , लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा’कार. अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि ‘सजा’कार ह्या दोघांचा बंदोबस्त करेलच. असो, आजच्या मुक्ती संग्रामाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा. आणि माझं मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील लढ्यात हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT