मोदींना खडेबोल, अमित शाहांच्या भूमिकेवरच सवाल; संजय राऊतांचं ‘रोखठोक’ भाष्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक बोलावली. या बैठकीत परिस्थिती जैसे थे ठेवण्यावर संमती झाली. या बैठकीवरून संजय राऊतांनी रोखठोक मध्ये भाष्य केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित केलाय.

संजय राऊत रोखठोक सदरात म्हणतात, ‘आज बेळगावकरांचा आवाज महाराष्ट्रात येण्यासाठी बुलंद आहे. ते संघर्ष करतात, पण या लढाईतून कारवारने केव्हाच माघार घेतली. त्यामुळे लढा मुख्यतः बेळगाव, निपाणीसह 56 गावांचा आहे व तो आता सर्वोच्च न्यायालयातही 2004 सालापासून सुस्तावलेल्या अजगराप्रमाणे पडून आहे. राममंदिराचा प्रश्न राजकीय झाला तेव्हा त्यावर सलग सुनावणी करून तो मार्गी लावला गेला; मग महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सलग सुनावणी घेऊन त्या प्रश्नाचा एकदाचा निकाल का लागू नये?’, असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपला लक्ष्य केलंय.

“ज्या प्रश्नासाठी आतापर्यंत 69 लोकांनी बलिदान दिले व ज्यासाठी आजही संघर्ष सुरूच आहे त्या प्रश्नी केंद्र सरकारने एकदाही हस्तक्षेप केला नाही व दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन चर्चा केली नाही. ती चर्चा आता फक्त 15 मिनिटे झाली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचले. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. शिंदे-फडणवीस सरकारची ‘छी। थू’ झाल्यावर ही बैठक दिल्लीत झाली,” अशी टीका राऊतांनी दिल्लीत झालेल्या बैठकीबद्दल केलीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Shiv Sena: महामोर्चा सुरु असतानाच ठाकरेंना मोठा धक्का, ‘तो’ आमदार शिंदेंच्या वाटेवर?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे भाजपकडून सीमावादाचा मुद्दा? राऊतांचा आरोप

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या आक्रमणापुढे कमजोर पडले हे आता स्पष्ट झाले. हा प्रश्न संघर्षातून नव्हे, तर चर्चेतून सुटेल व त्यासाठी आधी राजकारण थांबवायला हवे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपकडे कोणताही मुद्दा नाही. म्हणून मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमावादावर आक्रमण केले व महाराष्ट्राच्या गावांवर दावा सांगितला. त्याऐवजी त्यांनी सीमा भागातील मराठी संघटना व नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढायला हवा होता,” अशी भूमिका राऊतांनी लेखात मांडलीये.

ADVERTISEMENT

“मुंबईसह महाराष्ट्रात ‘कानडी’ लोकांचे मोठे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत हे त्यांनी विसरता कामा नये. हे भांडण दोन राज्यांतील लोकांचे नाही. ते सरकारांचे नाही. 70 वर्षांपूर्वी झालेल्या एका भाषिकांवरील अन्यायाची तड लागावी म्हणून हा माणुसकीचा झगडा सुरू आहे. तो इतक्या क्रूरपणे कोणाला चिरडता येणार नाही,” असंही राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

तापलेल्या सीमावादावर अमित शाहंचा तोडगा : दोन्ही मुख्यमंत्र्यांना सुचना; बैठकीत काय झालं?

ADVERTISEMENT

मोदींनी टोला, शाहांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह… संजय राऊत काय म्हणाले?

“सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकारला हा प्रश्न सोडवता येत नसेल तर न्यायासाठी कोणाचा दरवाजा ठोठवायचा? पंतप्रधान मोदी रशियन-युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात, पण महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. हे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नाही!,” अशा शब्दात संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे, तर “गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला हे ठीक, पण याप्रश्नी ते खरेच तटस्थ राहतील काय?,” असं म्हणत संजय राऊतांनी अमित शाह यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT