‘मुर्मू यांना स्वतःचं काही मत आहे का?’; संजय राऊतांचा राष्ट्रपतींच्या भूमिकेवरच सवाल
‘देशातल्या सद्यस्थितीवर मावळते राष्ट्रपती कोविंद यांनी कधी भाष्य केले नाही. द्रौपदी मुर्मू तरी काही बोलतील काय?,’ असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट मावळत्या आणि नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या भूमिकांबद्दल प्रश्न उपस्थित केला. संजय राऊतांनी रोखठोक सदरातून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरही आरोप केला आहे. संजय राऊतांनी रोखठोकमध्ये काय म्हटलंय? “महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाने लोकशाहीची […]
ADVERTISEMENT
‘देशातल्या सद्यस्थितीवर मावळते राष्ट्रपती कोविंद यांनी कधी भाष्य केले नाही. द्रौपदी मुर्मू तरी काही बोलतील काय?,’ असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट मावळत्या आणि नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या भूमिकांबद्दल प्रश्न उपस्थित केला. संजय राऊतांनी रोखठोक सदरातून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरही आरोप केला आहे.
संजय राऊतांनी रोखठोकमध्ये काय म्हटलंय?
“महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाने लोकशाहीची मूल्ये उद्ध्वस्त केली हे केंद्रातील राज्यकर्ते मानायला तयार नाहीत. आमदारांना फोडले व खासदारही फोडले. उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाहांच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केलं. त्याचा बदला शेवटी शिवसेना फोडून घेतला गेला. तेलंगणाचे के. सी. चंद्रशेखर राव व झारखंडचे हेमंत सोरेन यांची सरकारे भविष्यात याच पद्धतीने भरडली जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडू लागल्या आहेत. त्याच वेळी ज्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचे खटले होते अशा शिवसेनेतील फुटीर आमदार-खासदारांना सर्व जाचांतून मुक्त केलं. आता त्यांना शांत झोप लागेल. ईडी, सीबीआय त्यांच्या दारात जाणार नाही. समान न्यायाचे तत्त्व किती चुकीच्या पद्धतीने राबवले जात आहे ते स्पष्ट दिसते. भारतीय लोकशाही जिवंत आहे, पण ती कुणाची तरी आज बटीक आहे. हे चित्र काय सांगते?”
संजय राऊतांची ओम बिर्ला यांच्यावर टीका
“शिवसेनेचे 12 खासदार वेगळे झाले व त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. मूळ शिवसेनेतून ते सरळ बाहेर पडले. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा त्यांनाही लागू होतो. शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते विनायक राऊत यांनी फुटिरांबाबत दिलेल्या पत्राची साधी दखलही न घेता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फुटीर गटास मान्यता देऊन टाकली व कायदेशीररीत्या अडचणीत न येता कसे फुटावे याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. इतिहासात या घटनेची नोंद होईल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद यांच्याबद्दल राऊत काय म्हणाले?
“हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत देशाला नवा राष्ट्रपती लाभलेला असेल. ओडिशाच्या आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून विराजमान होतील. मुर्मू यांना स्वतःचं काही मत किंवा भूमिका आहे काय? त्यांना जाहीरपणे बोलताना अद्याप कुणी पाहिले नाही. देशातल्या सद्यस्थितीवर मावळते राष्ट्रपती कोविंद यांनी कधी भाष्य केले नाही. द्रौपदी मुर्मू तरी काही बोलतील काय?,” असं म्हणत संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
“न बोलणारे, कृती न करणारे व डोळे मिटून सर्वकाही सहन करणाऱ्यांसमोर भारतीय लोकशाही विवशतेनं उभी आहे. ती जिवंत आहे इतकेच. दूध, दही, कडधान्ये, स्टेशनरी अशा सगळ्यांवर सरकारनं ‘जीएसटी’ लादला. हे काँग्रेसच्या काळात घडले असते तर भारतीय लोकशाही उसळून रस्त्यावर उतरली असती. आज ती म्हातारीच्या आंब्याच्या झाडाला चिकटून लटकली आहे. ‘‘मला सोडवा, मला वाचवा’’ असा तिचा आक्रोश सुरू आहे. लोकशाही जिवंत आहे, पण ती मुर्दाड बनली आहे,” असं संताप संजय राऊतांनी रोखठोकमधून व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT