एकमेव अजित पवार खिशातून सटकले, शंभर कसे झेपणार?; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक शांत झाली, असं वाटत असतानाच आता संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्यांसह भाजप नेत्यांवर पलटवार केला आहे. ‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची ‘हास्यजत्रा’च केली आहे’, असा उपरोधिक टोला राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. शिवसेनेचे नेते आणि सामनाचे […]
ADVERTISEMENT
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक शांत झाली, असं वाटत असतानाच आता संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्यांसह भाजप नेत्यांवर पलटवार केला आहे. ‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची ‘हास्यजत्रा’च केली आहे’, असा उपरोधिक टोला राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचे बाण डागले आहेत. ‘कोरोनाचा कहर आणि लॉकडाऊनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात उठले, पण नाटक, सिनेमा थिएटर्स उघडण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे लोक राजकीय बातम्यांतूनच स्वतःचे मनोरंजन करून घेत आहेत.’
संजय राऊत म्हणतात, ‘गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधानं पाहिली की महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा आणि नाट्यगृहांची खरंच गरज आहे काय, असे वाटतं. सर्वत्रच विनोद व रहस्यमय असे मनोरंजन सुरू आहे’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे वाचलं का?
‘राजकारण्यांकडून विविध पातळ्यांवर मनोरंजन होतच असते. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची ‘हास्यजत्रा’च केली आहे. किरीट सोमय्या हे भाजपचे माजी खासदार रोज सकाळी उठून महाविकास आघाडीतील एका मंत्र्यावर आरोप करतात. त्यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडेच ठरतात’, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
‘महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. दिल्लीत मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, कॉ. हिरेन मुखर्जी यांनी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार मोहिमा राबवल्या. अनेक भ्रष्टाचार उघड केले. इंदिरा गांधी, संजय गांधीही त्यातून सुटले नाहीत. महाराष्ट्रात दत्ता पाटील, मृणाल गोरे, केशवराव धोंडगे, कृष्णराव धुळपांपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला घाम फोडला, पण त्यात आजच्यासारखा विखार नव्हता. शिवाजीराव निलंगेकर, बॅ. अंतुले, विलासराव देशमुख यांनाही विरोधी पक्षाच्या जोरदार हल्ल्यांमुळेच जावे लागले, पण आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे ‘हास्यजत्रा’ म्हणून पाहिले जात नव्हते!’, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.
ADVERTISEMENT
‘चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस फिरतात. हे विधान गमतीचेच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार? पण पाटील यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवलेच असेल तर त्यांना कोण थांबवणार?’, असा सवालही राऊत यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस असे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात: चंद्रकांत पाटील
‘ईडीच्या नावाने धमक्या द्यायच्या व चिखलफेक करायची हेच त्यांचे काम. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांना टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावं लागते. ‘सामना’तील एका अग्रलेखावर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली व एक खरमरीत पत्र ‘सामना’स पाठवले. त्यात भूमिका कमी व जळफळाटच जास्त. तरीही ते पत्र ‘सामना’ने जसेच्या तसे छापले. त्या पत्रात पाटील यांनी अनेक ठिकाणी अपमानकारक, अब्रुनुकसानी करणारी विधाने करूनही ते सर्व प्रसिद्ध करण्याचे मोठेपण ‘सामना’ने दाखवले, पण लिहिता, बोलताना भान सुटले की स्वतःच्याच धोतरात लोक कसे पाय अडपून पडतात ते या पत्रावरून दिसते.’
‘सुशील सुर्वे यांनी चंद्रकांत पाटलांच्या पत्रातील हास्यजत्रा समोर आणली. त्यामुळे त्यांचेच धोतर सुटले. आता धोतरावर कुणी बोलले म्हणून हिंदू धर्माचा अपमान झाल्याची बोंब भाजप आमदारांकडून ठोकली गेली, पण देशातील अनेक इस्लामी देशातही लुंगीवजा धोतरे वापरली जात आहेत. ते एक वस्त्र आहे. गाय हा ज्याप्रमाणे एक उपयुक्त पशू आहे असे वीर सावरकर सांगून गेले तसे ‘धोतर’, ‘धोती’ हे एक वस्त्रच आहे’, असंही राऊतांनी भाजपला सुनावलं आहे.
चंद्रकांत पाटलांच्या पत्रात काय चुकलं?
राऊत म्हणतात, ‘सुशील सुर्वे काय सांगताहेत ते पहा, ‘महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये छापून आलेल्या संजय राऊत यांच्या संपादकीय लेखावर आपलं उत्तर दिलं. जे ‘सामना’ने प्रकाशित केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या उत्तराच्या शेवटून तिसऱ्या परिच्छेदातल्या नवव्या ओळीत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लिहिलं आहे की, ‘शरद पवारांवर कोणी टीका केली की त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे तुम्ही अंगावर येता. त्यामुळेच तुम्हाला शिवसेनेत कोणी गांभीर्याने घेत नाहीत, असे दिसते.’ पत्रातल्या या संपूर्ण ओळीत संजय राऊतांची शिवसेनेत कशी दखल घेतली जात नाही, त्यांना शिवसेनेत कुणी किंमत देत नाही याकडे चंद्रकांतदादांनी लक्ष वेधलं आहे, पण पत्रातल्या अगदी याच ओळीला लागून असलेल्या ओळीत हेच चंद्रकांतदादा लिहितात की, तुमच्या मध्यस्थीने आणि पुढाकाराने शिवसेनेने भाजपसोबतची विजयी युती तोडली आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता मिळवली.
चंद्रकांतदादा आधीच्या ओळीत म्हणतात की, संजय राऊत यांना शिवसेनेत कुणी गांभीर्याने घेत नाहीत, पण पुढच्याच ओळीत शिवसेना-भाजप युती तोडण्यात संजय राऊत यांची मध्यस्थी आणि पुढाकार होता असे म्हणत असतील तर संजय राऊत यांना शिवसेनेत केवळ गांभीर्यपूर्वक घेतलं जात नाही, तर शिवसेनेच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा गंभीर सहभाग असतो असा त्याचा अर्थ होतो. एकाच परिच्छेदात चंद्रकांतदादांच्या उत्तरातला हा विरोधाभास त्यांच्या पक्षातल्या लिखाणनैपुण्याला आणि शब्दचातुर्यालाही छेद देणारा आहे, अशी (दिसून येणारी) घोडचूक एका भाजप नेत्याने करणं हे बरं नव्हं!.’
‘हे सगळं पाहिल्यावर खरंच वाटतं, चंद्रकांत पाटलांसारख्या नेत्यांवर करमणुकीचा कर लावायलाच हवा. महाराष्ट्रातील विरोधकांची ‘हास्यजत्रा’ ही लोकशाहीची धोक्याची घंटा ठरत आहे!’, असा चिमटाही राऊतांनी भाजपला काढला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT