अदाणी म्हणजे ‘रिझर्व्ह बँक ऑफ बीजेपी’; संजय राऊतांचे स्फोटक ‘रोखठोक’
Sanjay Raut Rokhthok On Adani Group : अदाणी समूहाबद्दलच्या (Adani Group) हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने (Hindenburg report) जगभरात खळबळ उडालीये. हा अहवाल समोर आल्यानंतर गौतम अदाणींना (Gautam Adani) प्रचंड फटका बसला आहे. दुसरीकडे यावरून संसदेत विरोधक आक्रमक झाले आहेत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह (RSS) भाजपच्या नेत्यांकडून (BJP Leaders) अदाणींची पाठराख केली जात असल्याचं चित्र आहे. याच […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut Rokhthok On Adani Group : अदाणी समूहाबद्दलच्या (Adani Group) हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने (Hindenburg report) जगभरात खळबळ उडालीये. हा अहवाल समोर आल्यानंतर गौतम अदाणींना (Gautam Adani) प्रचंड फटका बसला आहे. दुसरीकडे यावरून संसदेत विरोधक आक्रमक झाले आहेत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह (RSS) भाजपच्या नेत्यांकडून (BJP Leaders) अदाणींची पाठराख केली जात असल्याचं चित्र आहे. याच प्रकरणावरून खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्ला चढवला. संजय राऊतांनी रोखठोक सदरातून थेट अदाणी आणि मोदींवर टीका केलीये. (Adani group-Hindenburg report : Sanjay Raut says in Rokhthok that Adani group is reserve bank of Bjp)
“गौतम अदाणी प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे व जगात भारतीय अर्थव्यवस्थेची लक्तरे निघाली आहेत. एखाद दुसऱ्या उद्योगपतींच्या करंगळीवर एखाद्या महान देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असावा हे हास्यास्पदच होते, पण गेल्या सात-आठ वर्षांत हा पोकळ डोलारा उभा राहिला. ही करंगळी अदाणी यांची होती की प्रत्यक्ष आपले पंतप्रधान मोदी यांची, हाच संशोधनाचा विषय आहे”, असा गंभीर मुद्दा राऊतांनी उपस्थित केला आहे.
अदाणी समूह, हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल : संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये नेमक काय म्हटलंय?
संजय राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलंय की, “मुळात गौतम अदाणी व त्यांच्या उद्योगाचे साम्राज्य तकलादू पायावरच उभे होते. अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या एका फुंकरीने ते कोसळले. त्याचा फटका देशाला बसला. अदाणी यांच्या आर्थिक साम्राज्याचा मुखवटा ओढणे हा देशावरचा हल्ला असे आता सांगितले जात आहे. अदाणी म्हणजेच भारत असे आता बोलले गेले. हा भारतमातेचा अपमान. प्रश्न काय आहे? 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अदाणींच्या साम्राज्यावर हल्ला का झाला? याचे कारण एकच, अदाणी व मोदी. अदाणी व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू. भारतीय अर्थव्यवस्थेची इतकी मोठी लूटमार सिद्ध होऊनही भाजप गप्प आहे. यामुळे ते सिद्धच झाले. अदाणी म्हणजे भाजप याचा अर्थ स्पष्ट आहे. अदाणी यांच्याकडे भाजपचा पैसा गुंतला आहे. तेच भाजपचे मुख्य अर्थ पुरवठादार आहेत. भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदाणींवर हल्ला झाला! अदाणींवरील हल्ला हा भाजपच्या ‘रिझर्व्ह बँके’वर हल्ला आहे”, असं खळबळजनक भाष्य राऊतांनी केलं आहे.
“भाजप सरकार इतक्या मोठ्या घोटाळ्यावर गप्प आहे”, राऊतांकडून भाजपच्या कोंडीचा प्रयत्न
“आणीबाणीच्या कालखंडात ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा देण्यात आली. सध्या ‘मोदी म्हणजेच भारत’ असे सांगितले जात असतानाच उद्योगपती गौतम अदाणी यांनी स्वतःची तुलना भारताशी केली व आपल्या फसवणुकीवर झालेला हल्ला हा भारतावरील हल्ला असल्याचा दावा केला. त्यामुळे नक्की भारत किती व भारत कोणाचा? असा प्रश्न पडला आहे. गौतम अदाणी कोण? हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदाणी व त्यांच्या उद्योग साम्राज्याची श्रीमंती वाढत गेली. अदाणी हे विमानतळापासून बंदरे, सार्वजनिक उपक्रमांचे मालक बनले. उद्योगाच्या सर्वच क्षेत्रांत ते घुसले व कमी काळात शिखरावर गेले. शेवटी शेवटी त्यांनी मुंबईतील ‘धारावी’ हा पुनर्वसन प्रकल्पही स्वतःच्याच पंखाखाली घेतला. देशातील विकासाच्या प्रत्येक विटेवर व मातीच्या कणावर अदाणींचेच नाव असावे याची काळजी मोदींचे सरकार घेत राहिले व अदाणींची श्रीमंती वाढावी म्हणून देशाच्या सार्वजनिक बँका, विमा पंपन्या अदाणींना हजारो कोटी रुपये देत राहिल्या. पण हे साम्राज्य तकलादू पायावर उभे होते व अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेच्या एका शोधनिबंधाने अदाणींचे राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून पडले. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा यानिमित्ताने समोर आला व विरोधकांच्या घरी पाच-दहा लाखांच्या व्यवहारासाठी ईडी, सीबीआयची पथके पाठवणारे भाजप सरकार इतक्या मोठ्या घोटाळ्यावर गप्प आहे”, असं म्हणत राऊतांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.