‘शेतकरी नवरा हवा ग बाई’ मालिका वादात! प्रकरण पोलिसांपर्यंत, कारण…
–स्वाती चिखलीकर, सांगली माझ्या पुस्तकातील कथानक आणि नाव चोरून कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेत दाखवली जात असल्याची तक्रार संबंधीत लेखिकेनं केली आहे. कलर्स मराठी या मनोरंजन वाहिनीवर सुरू असणाऱ्या ‘शेतकरी नवरा हवा’ मालिकेचे नाव व कथानक चोरल्याचा आरोप सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या लेखिका मेधा पाटील यांनी केला आहे. त्यांनी मालिकेच्या निर्मात्यांविरोधात आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. […]
ADVERTISEMENT

–स्वाती चिखलीकर, सांगली
माझ्या पुस्तकातील कथानक आणि नाव चोरून कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेत दाखवली जात असल्याची तक्रार संबंधीत लेखिकेनं केली आहे. कलर्स मराठी या मनोरंजन वाहिनीवर सुरू असणाऱ्या ‘शेतकरी नवरा हवा’ मालिकेचे नाव व कथानक चोरल्याचा आरोप सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या लेखिका मेधा पाटील यांनी केला आहे. त्यांनी मालिकेच्या निर्मात्यांविरोधात आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शेतकरी नवरा ही कादंबरी त्यांनी 2017 मध्येच प्रकाशित केली होती. त्यांचा दावा आहे की, या मालिकेचं नाव आणि त्यात दाखवण्यात येत असलेली कथा, ही त्यांच्या शेतकरी नवरा या पुस्तकातील आहे.
मालिकेला मिळत आहे पसंती
कलर्स मराठी या वाहिनीवर शेतकरी नवरा हवा, ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित होत असते. या मालिकेचे कथानक जसे पुढे जात आहे, तसे दर्शकांची आवड वाढू लागली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या जीवनावरती ही मालिका असल्याने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात सुद्धा या मालिकेला मोठ्या संख्येने पसंती मिळत आहे. मात्र आता ही मालिका वादात अडकली आहे. या मालिकेचे नाव व मालिकेची कथा शेतकरी नवरा या कादंबरीतून चोरल्याचा आरोप मेधा पाटील यांनी केला आहे.
लेखिकेने पोलिसांत केली तक्रार
लेखिका मेधा पाटील यांनी म्हटलं आहे की, या मालिकेचे नाव व या मालिकेतील कथानक हे शेतकरी नवरा या कादंबरीच्या नावाची व कथानकाची तोडजोड करून तयार केलेले आहे. या मालिकेमधील कथानक मधील काही भाग जसाच्या तसा दाखवण्यात येत आहे. त्यातील काही भागांमध्ये लहान मोठा बदल करून दाखवण्यात येत आहे, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी या संदर्भात निर्मात्यांना संपर्क केला. व चित्रपट महामंडळ यांच्याशीही संपर्क केला, मात्र त्यांना योग्य उत्तर मिळालं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी कलर्स मराठी वाहिनी व निर्माते यांच्या विरोधात कथानक चोरी केल्याची आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
चोरीचे आरोप फेटाळले; सहनिर्माते काय म्हणाले?
लेखिका मेधा पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शेतकरी नवरा हवा या मालिकेचे सहनिर्माते संजय खांबे यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू विचारली असता याबाबत त्यांनी सांगितले सदर मालिकेच्या सुरुवातीला मालिकेची मूळ संकल्पना कलर्स मराठी यांची आहे, असा मजकूर प्रसिद्ध केला जातो. आम्हाला ही मालिका बनवण्यासाठी कलर्स मराठी यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे या मालिकेचे नाव व कथानक चोरीच्या आरोपाबद्दल आमचा संबंध नाही याबाबत लेखिका यांनी कलर्स मराठी यांच्याशी संपर्क साधने उचित असेल असे म्हणाले.
मालिकेच्या पटकथा लेखकाचं म्हणणं काय?
तर या मालिकेची पटकथा लेखक हे स्वप्निल गांगुर्डे आहेत. त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून त्यांची बाजू विचारली असता त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की, सदरची कथा ही मला कलर्स मराठीने दिलेली आहे. व यावरती मला पटकथा लिहिण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे ही कथा कलर्स मराठी ने कुठून आणली याबाबत मला काही सांगता येणार नाही. त्यामुळे लेखिकेने कलर्स मराठीशी संपर्क साधणे योग्य होईल असंच म्हटलं आहे. याबाबत पोलिसांना विचारलं असता, याबाबत तक्रार आमच्याकडे आलेली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करीत आहोत कॉपीराईट कायद्याचा भंग झाला आहे का, इत्यादी बाबत आम्ही चौकशी करत आहोत.