उद्धव ठाकरेंनी मैदान मारलं! शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच
मुंबईतल्या दादर भागात असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचाच आवाज घुमणार, हे स्पष्ट झालं. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला मात्र, झटका बसलाय. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील […]
ADVERTISEMENT

मुंबईतल्या दादर भागात असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचाच आवाज घुमणार, हे स्पष्ट झालं. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला मात्र, झटका बसलाय. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती. शिवसेनेनं परवानगी मागितल्यानंतर शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनीही महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर महापालिकेनं दोन्ही अर्ज फेटाळून लावले होते.
मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवसेनेनं महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेला विरोध करणारी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने आज शिवसेना, शिंदे गट आणि मुबई महापालिका अशा तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. तिन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला.