सुप्रिया सुळेंआधीच शिवसैनिकांनी केलं रस्त्याचं भूमिपूजन; शिरूरनंतर पुरंदरमध्ये आघाडीत बिघाडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात सगळंच अलबेल असल्याचं दाखवलं जात असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र, सुप्त संघर्ष दिसून येत आहे. तिन्ही पक्षांतील अंतर्गत कुरबूरी अनेकदा चव्हाट्यावरही आल्या आहेत. शिरूरमधील आढळराव पाटील-कोल्हे संघर्षापाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजित कार्यक्रमाआधीच शिवसैनिकांनी रस्त्याचं भूमिपूजन केल्यानं तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आज (२८ जानेवारी) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेला बाजूला ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादीने विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे खासदार आणि आमदारांना बाजूला ठेवत गुरोळी येथील रस्त्याच्या कामाचं शिवसैनिकांनीच भूमिपूजन केलं आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या हस्तेही या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं.

वाघापूर चौफुला ते गुरोळी गाव या रस्त्यासह रावडेवाडी, कोडीत बुद्रूक (धरणवस्ती), सोनोरी, चांबळी, सुपे खुर्द आदी रस्त्यांसाठी शिवतारे यांनी निधी मंजूर करून घेतला, असा दावा शिवसेनेकडून केला जातो आहे. मात्र, रस्त्यांच्या कामांची मंजुरी आणि निधी मिळवण्यासाठी शिवसेनेचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी प्रयत्न केला असताना देखील आजच्या भूमिपूजन आणि उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात येत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही’, असं म्हणत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. तसेच वाघापूर चौफुला ते गुरोळी या रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव आणि ज्योती झेंडे यांच्या हस्ते करण्यात आलं.

हे वाचलं का?

या रस्त्याचं भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता होणार होतं. मात्र, त्यापूर्वीच शिवसैनिकांनी आणि ग्रामस्थांनी भूमिपूजन केल्यानं आयोजकांची एकच तारांबळ उडाली. मात्र, या गोष्टीची वाच्यता न होऊ देता सुप्रिया सुळे यांच्या हस्तेही भूमिपूजन करण्यात आलं.

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्रित काम करीत असले, तरी पुरंदर तालुक्यात चित्र काहीसं वेगळं आहे. पुरंदर तालुका हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, पण २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळीक आहे. मात्र, विकासकामात शिवसेनेला अजूनही दूर ठेवलं जात असल्याचा आरोप शिवसैनिकाकडून होत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT