परीकथेतील ‘राज’कुमारा!
तो डोळ्यांची भाषा जाणत होता, त्याच्या डोळ्यांनीच तो बोलायचा. तो रूपेरी पडद्यावर आला की सगळा पडदा आपल्या असण्याने व्यापून टाकायचा. बरोबर.. राज कपूर. राज कपूर यांची आज जयंती. राज कपूर यांना जाऊन 33 वर्षे झाली आहेत. तरीही त्यांचं पडद्यावरचं असणं आपण, आपल्या पिढ्या आणि पुढच्या कैक पिढ्या विसरणार नाहीत. तो काळ OTT, APP यांचा नव्हता. […]
ADVERTISEMENT
तो डोळ्यांची भाषा जाणत होता, त्याच्या डोळ्यांनीच तो बोलायचा. तो रूपेरी पडद्यावर आला की सगळा पडदा आपल्या असण्याने व्यापून टाकायचा. बरोबर.. राज कपूर. राज कपूर यांची आज जयंती. राज कपूर यांना जाऊन 33 वर्षे झाली आहेत. तरीही त्यांचं पडद्यावरचं असणं आपण, आपल्या पिढ्या आणि पुढच्या कैक पिढ्या विसरणार नाहीत. तो काळ OTT, APP यांचा नव्हता. तो काळ मल्टिप्लेक्स आणि नव्या तंत्रज्ञानाचाही नव्हता. तो काळ होता सिंगल स्क्रिन थिएटर्सचा. त्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला आणि त्यांच्या मनावर राज्य करणारा राजा होता राज कपूर.
ADVERTISEMENT
दादासाहेब फाळकेंना सिनेसृष्टीचे जनक असं संबोधलं जातं. मूकपट असोत किंवा त्यानंतर बोलपट ते आणण्यात आणि मनोरंजनाचं नवं कवाड उघडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे यात काही शंकाच नाही. त्यांच्या इतकंच महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे राज कपूर यांचं. राज कपूर यांनी विविध प्रकारचे सिनेमा देऊन मनोरंजन विश्वात आपलं नाव कायमचं कोरून ठेवलं आहे. हिंदी सिनेसृष्टी ही राज कपूर यांच्या नावाशिवाय अधुरी आहे.
हे वाचलं का?
राज कपूर यांनी 1948 मध्ये आग या सिनेमातून त्यांनी त्यांचं दिग्दर्शीय पदार्पण केलं. तर त्याआधी 1947 ला आलेला नील कमल हा नायक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा होता. ते हयात असेपर्यंत हिंदी सिनेसृष्टीचं बॉलिवूड असं नामकरण झालेलं नव्हतं. त्या काळात नंबर वन, नंबर टू अशा स्पर्धाही नव्हत्या. दिलीप कुमार, देवआनंद, राज कपूर ही त्रयी 50, 60 आणि 70 चं दशक गाजवणारी ठरली. बाकी त्यांच्यावेळी जॉय मुखर्जी, प्रेमनाथ, राजेंद्र कुमार असे हिरोही होतेच. पण सगळ्यांना भुरळ पडली होती ती या त्रयीची. राज कपूर यांनी अभिनय करत असतानाच दिग्दर्शक म्हणूनही ते काम करत होते.
ADVERTISEMENT
1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी राज कपूर यांनी देशाच्या सिनेसृष्टीत योगदान देण्यास सुरूवात केली होती. सामाजिक आशय जपणारे अनेक सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केले त्यात कामही केलं. आवारा, आह, बूट पॉलिश, श्री 420, जागते रहो या सगळ्या सिनेमांची जादू आजही कायम आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे राज कपूर, त्यांचं आर के बॅनर आणि नर्गिस. होय राज कपूर यांच्या सिनेमांमध्ये बहुतांशवेळा नर्गिस यांनी काम केलं आहे. तसंच आर. के. फिल्मस हे नाव मोठं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते स्वतःला शोमन म्हणवून घेत नसत पण ते शोमन होते हे लोकांनी मान्य केलं होतं.
ADVERTISEMENT
चार्ली चॅप्लिनचा प्रभाव
राज कपूर यांच्या अभिनयावर काही प्रमाणात चार्ली चॅप्लिनचा प्रभाव होता. त्यांचा पेहराव, त्यांची टोपी, त्यांची हसण्याची पद्धत. निरागस चेहरा, फास्ट फॉर्वर्डमध्ये सिनेमातले काही सीन चित्रित करण्याची पद्धत हे सगळं काही चार्ली चॅप्लिनच्या शैलीशी मिळतंजुळतं होतं. मात्र ते सगळं आपण हसत हसत स्वीकारलं कारण अभिनय, दिग्दर्शन आणि सिनेमा हे सगळं हा माणूस जगतो आहे हे आपल्याला ठाऊक होतं.
कपूर घराणं मूळचं पेशावरचं. पेशावर सध्या पाकिस्तानात आहे. मात्र पृथ्वीराज कपूर 1929 मध्ये इथे आले, इथलेच झाले. राज कपूर हा त्यांचाच मुलगा. कपूर घराण्याने आपल्या हिंदी सिनेसृष्टीला शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, राजू कपूर, ऋषी कपूर, करीश्मा कपूर, करीना कपूर, रणबीर कपूर असे एकाहून एक स्टार्स दिले. याचंही श्रेय जातं ते राज कपूर यांनाच. पृथ्वीराज कपूर यांचं काम मोठं होतं यात काही शंकाच नाही. मात्र त्यांचा मुलगा राज त्यांच्याही दोन पावलं पुढे निघून गेला. सिनेमा, दिग्दर्शन, निर्मिती, संगीत सगळ्यामध्ये आपलं योगदान देत राज कपूर यांनी सिनेसृष्टीत आपलं अढळपद सिद्ध केलं आहे.
त्यांच्या काळातले ते सर्वात तरूण दिग्दर्शक होते. आग या सिनेमाचं दिग्दर्शन जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्यांचं वय अवघं 24 वर्षे होतं. नर्गिस आणि राज कपूर या जोडीला आणि केमिस्ट्रीला सिनेरसिकांची प्रचंड पसंती मिळाली. संगम या सिनेमात राजेंद्र कुमार, वैजयंती माला आणि राज कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रूंजी घालणारं संगीत, मोहून टाकणारी गाणी आणि लोकेशन्स हे या सिनेमाचं वैशिष्ट्य. हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा, बोल राधा बोल संगम होगा के नहीं, मै क्या करूँ राम मुझे बुढ्ढा मिल गया, ये मेरा प्रेम पत्र पढकर, दोस्त दोस्त ना रहा अशी सगळी गाणी हिट ठरली. दोन मध्यंतर असलेला हा सिनेमा होता. 1964 मध्ये आलेल्या या सिनेमाने रेकॉर्ड मोडले होते असं म्हणतात. प्रेमाचा त्रिकोण असल्याची कथा यात होती.
अजरामर गाणी, संगीत आणि राज कपूर
प्रेक्षकांना काय हवं याची अत्यंत चांगली जाण राज कपूर यांना होती. त्यांचे एकाहून एक सरस चित्रपट आणि त्यातली गाणी आजही आपल्याला हेच सांगतात. मग ते मेरा जुता है जापानी असो, आवाराँ हूँ असो किंवा रमैय्या वस्ता वैय्या असो. मुड मुड के ना देख मुड मुडके, इक दिन बिक जाएगा माटी के मोल, ओह रे ताल मिले नदी के जलमें, जिना यहाँ, मरना यहाँ, जाने कहाँ गये वो दिन अशी कितीतरी गाणी आजही आपल्या ओठांवर आहेत. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. विविध वाद्यं ते स्वतः वाजवतही असत.
राज कपूर पडद्यावर गात असताना त्यांना आवाज दिला तो मुकेश यांनी. मुकेश यांचा आवाज हा त्यांचा आवाज न वाटता राज कपूर यांचाच आवाज वाटत असे इतका तो आवाज राज कपूर यांच्याशी एकरूप झाला होता. त्यामुळेच 1976 मध्ये जेव्हा मुकेश यांचं निधन झालं तेव्हा माझा आवाज गेला अशी प्रतिक्रिया राज कपूर यांनी दिली होती. मुकेश यांनी राज कपूर यांच्यासाठी गायलेलं प्रत्येक गाणं हे आजही आपल्या मनात घर करतं. मुकेश यांनी इतर अभिनेत्यांनाही आवाज दिले. मात्र त्यात मुकेश गातो आहे हे लक्षात यायचं. राज कपूर यांच्याबाबतीत ते झालं नाही. राज कपूरच गात आहेत हेच वाटत असे.
मेरा नाम जोकर
राज कपूर यांच्या आयुष्यातला त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता मेरा नाम जोकर. हा सिनेमा आपण करावा असा चंग 1955 मध्येच राज कपूर यांनी बांधला होता. श्री 420 या सिनेमाची निर्मिती करत असतानाच त्यांना हा सिनेमा करण्याचं नक्की केलं होतं. हा सिनेमा 1970 मध्ये रिलिज झाला. राज कपूर, सिम्मी गरेवाल, धर्मेंद्र, दारासिंग, मनोज कुमार, राजेंद्र कुमार, पद्मिनी अशा कलाकरांची फौज या सिनेमात होती. 4 तास 15 मिनिटांच्या या सिनेमाला दोन इंटरव्हल होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.
एका मुलाचे वडील जोकर असतात, ते सर्कसमध्ये काम करत असतात. त्या सर्कसमध्येच त्यांचा मृत्यू झालेला असतो. तेव्हापासूनच राजूला (राज कपूर) यांना जोकर बनायचं असतं. पौगंड अवस्थेतला मुलगा ते एका सर्कशीत काम करणारा जोकर आणि त्याच्या आयुष्यात घडणारे विविध बदल. त्याच्या आयुष्यात मिळालेलं प्रेम, अधुरी राहिलेली स्वप्नं या सगळ्यावर भाष्य करणारा हा सिनेमा होता. राज कपूर यांचा पौगंड अवस्थेतली भूमिका चिंटूने म्हणजेच ऋषी कपूरने केली होती. सहा वर्षे हा सिनेमा तयार होत होता. तो बॉक्स ऑफिसवर आपटला आणि एखादा स्वप्नभंग होतो तशी राज कपूर यांची अवस्था झाली होती.
एकदा ऋषी कपूर यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं की हा सिनेमा फ्लॉप झाल्याने आम्ही दिवाळखोर झालो होतो. घर, स्टुडिओ सगळं गहाण टाकून हा सिनेमा तयार केला होता आणि तो अपयशी ठरला. मात्र हे अपयश अक्षरशः धुवून काढलं ते राज कपूर यांच्या पुढच्या सिनेमाने. ज्याचं नाव होतं बॉबी. 20 वर्षांचा ऋषी कपूर, 17-18 वर्षांची डिंपल. या सिनेमावर लोकांनी केलेलं प्रेम आणि या सिनेमाला मिळालेलं यश यामुळे राज कपूर यांनी पुन्हा एकदा त्यांचं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.
बॉबीच्या यशानंतर राज कपूर यांनी सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली हो गयी, हिना या सिनेमांचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली. हिना या सिनेमात अश्विनी भावे, ऋषी कपूर आणि झेबा बख्तियार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. राज कपूर यांनी हा सिनेमा सुरू केला होता, मात्र 1988 ला त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी हा सिनेमा पूर्ण केला राज कपूर की आखरी फिल्म असं टायटल या सिनेमाच्या पोस्टरवर अनेक ठिकाणी लिहिण्यात आलं होतं. या सिनेमालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
बोल्डनेस पडद्यावर आणणारा दिग्दर्शक
आपल्या सिनेमांमधून राज कपूर यांनी जसा सामाजिक आशय पोहचवला तसाच त्यांनी बोल्डनेसही पडद्यावर आणला. मग तो संगम सिनेमा असो की राम तेरी गंगा मैली हो गयी. दोन फुलं समोरासमोर एकमेकांना चिकटतात आणि मग आशय प्रेक्षकांपर्यंत पोहचतो अशी भाबडी समजूत ठेवणाऱ्यांमधले राज कपूर नव्हते. बोल्डनेस हा त्यांच्या चित्रपटांमधला महत्त्वाचा भाग होता. राम तेरी गंगा मैली, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग अशी किती तरी नावं घेता येतील. वैजयंतीमाला यांना स्विम सूट घालायला लावण्याचं धाडस केलं ते राज कपूर यांनीच. संगम चित्रपटातलं बोल राधा बोल संगम होगा के नहीं हे गाणं आठवा. अशी किती तरी उदाहरणं देता येतील मग ते सत्यम शिवम सुंदरमचं टायटल साँग असो किंवा बॉबी सिनेमात डिंपलने केलेलं अंगप्रदर्शन असो. बोल्डनेस त्यांनी आणला हे बघायला आवडतं म्हणूनही प्रेक्षक सिनेमाकडे वळतात ही त्यांची धारणा होती. जी मुळीच खोटी नव्हती.
एकापेक्षा एक सरस चित्रपट, एकाहून एक सुमधुर गाणी आणि मनोरंजनाचा अखंड तेवत राहणारा वारसा ठेवून हा शोमन अनंताच्या प्रवासाला केव्हाच निघून गेला आहे. मात्र तो आपल्या मनात अजूनही जिवंत आहे त्याच्या नटखट, अवखळ डोळ्यांनी आपल्याला आपलंसं करत, मुकेशचा आवाज आपल्या हृदयात स्वतःचा म्हणून भिनवत..किमया करणारा… एखाद्या परीकथेतल्या राजकुमारासारखा! त्यामुळेच त्याच्या गाण्याच्या ओळी आठवतात.. त्याच्या मनात असण्याची साक्ष पटवतात…
कल खेल में हम हों न हों
गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलोगे तुम,
भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT