सांगली : लग्नास नकार दिला, मुलीच्या वडिलांवर तरुणाचा खुरप्याने हल्ला; झटापटीत मुलीचं बोट पूर्णपणे तुटलं
Sangli Crime : सांगली : लग्नास नकार दिला, मुलीच्या वडिलांवर तरुणाचा खुरप्याने हल्ला; झटापटीत मुलीचं बोट पूर्णपणे तुटलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगली : लग्नास नकार दिला, मुलीच्या वडिलांवर तरुणाचा खुरप्याने हल्ला
झटापटीत मुलीचं बोट पूर्णपणे तुटलं, मिरजमधील घटना
Sangli Crime, मिरज : लग्नाच्या प्रस्तावाला नकार मिळाल्याचा राग मनात ठेवून एका तरुणाने मुलीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील टाकळी परिसरात रविवारी उघडकीस आली. या हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या मुलीच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. तिचे एक बोट पूर्णपणे तुटले आहे. दोघांवर मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अक्षय सुभाष पाटील (वय 24, रा. टाकळी, ता. मिरज) या तरुणाची एका गावातील मुलीशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने मुलीच्या वडिलांकडे मागणी घातली होती. मात्र, मुलीच्या वडिलांनी हा प्रस्ताव स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारानंतर गावातील नातेवाईक आणि काही मान्यवरांनी अक्षयला समज देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याच्या मनातील संताप कमी झाला नाही.
हेही वाचा : मला मारण्यासाठी चप्पल उचलली, शिव्या दिल्या, मला अनाथ केलं गेलंय, लालू यादवांच्या कन्येची खळबळजनक पोस्ट
दरम्यान, मुलीचा साखरपुडा दुसऱ्या तरुणासोबत रविवारी सायंकाळी ठरला होता, अशी माहिती अक्षयला मिळाली. त्यानंतर रागाच्या भरात अक्षय रविवारी सकाळी मुलीच्या घराजवळ पोहोचला. त्याने मुलीच्या वडिलांवर खुरप्याने जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. वडिलांची अवस्था पाहून मुलगी त्यांना वाचवण्यासाठी धावून आली. मात्र, अक्षयने तिच्यावरही वार केला. या हल्ल्यात तिच्या डाव्या हाताला तीव्र दुखापत झाली आणि तिचे एक बोट पूर्णपणे तुटले. घटनेनंतर अक्षय पाटील परिसरातून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.










