Yogendra Yadav : “महाराष्ट्रातलं सरकार पैशांचा खेळ करून बदललं”
देशात आज अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सरकार पैशाच्या जोरावर बदलले असून या देशात पैशाचा खुल्लमखुल्ला खेळ सुरू आहे. हे थांबविणे गरजेचे आहे. देश संकटात असून संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत योगेंद्र यादव यांनी केले. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी […]
ADVERTISEMENT

देशात आज अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सरकार पैशाच्या जोरावर बदलले असून या देशात पैशाचा खुल्लमखुल्ला खेळ सुरू आहे. हे थांबविणे गरजेचे आहे. देश संकटात असून संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत योगेंद्र यादव यांनी केले. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील, रणजीतसिंह देशमुख, काँग्रेसचे जिल्हाप्रमुख डॉ. सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
योगेंद्र यादव यांनी काय म्हटलं आहे?
योगेंद्र यादव म्हणाले, भारत जोडो यात्रेमध्ये लोकांनी सहभागी व्हावे यासाठी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर येथून या जनसंवाद यात्रेचा प्रारंभ झाला असून कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, नंतर रात्री उशिरा सांगली येथे ही यात्रा पोहोचली. त्यानंतर आज सकाळी सातारा जिल्ह्यात या जनसंवाद यात्रेचे आगमन झाले असून येथे या यात्रेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेत लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असून नऊ जिल्ह्यांमधून ही यात्रा नांदेड येथे 8 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे.
हिंदुत्वाचा नारा देऊन काही लोक देश तोडण्याचं काम करत आहेत
आज देशासमोर अनेक संकटे आहेत. युवकांचे रोजगार जात आहेत. हिंदुत्वाचा नारा देऊन देश तोडण्याचे काम काही मंडळींकडून केले जात आहे. सत्तेच्या आशीर्वादाने देशाचे तुकडे करण्यासाठी सर्वोच्च पदावर बसलेल्या काही व्यक्तींकडून प्रयत्न केले जात आहेत. पैशाचा खुल्लमखुल्ला खेळ सुरू असून महाराष्ट्रातील सरकारही पैशानेच बदलल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे. देश संकटात असताना कोर्ट-कचेरीच्या माध्यमातून ही लोकांना न्याय मिळणे अवघड झाले आहे. म्हणून तर भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. जे प्रश्न लोक इतर वेळेला मांडू शकत नाहीत, उघडपणे बोलू शकत नाहीत, ते सर्व प्रश्न भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मांडले जात आहेत. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राजनीती विरोधात भारत जोडो यात्रा आहे. गरीबी, बेरोजगारी, तिरस्कार, आर्थिक विषमता या सर्व मुद्द्यांवर भारत जोडो यात्रेमध्ये चर्चा होणार आहे. देशात प्रत्येकाला वाटणारे एकटेपण या यात्रेने संपवले आहे. भारत जोडो यात्रेने सर्वांचा हात पकडला आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर भारत जोडो यात्रा महायात्रा होईल, असा विश्वासही योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला.
भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा
भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण राजनीतीला राजनीतीनेच उत्तर द्यावे लागते. या यात्रेमध्ये अनेक समविचारी लोक, पक्ष सहभागी होत आहेत, भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने आम्ही दिल्ली येथे सर्व समविचारी लोक व संघटनांची बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये दीडशे पेक्षाही जास्त संघटना सहभागी झाल्या होत्या. त्या बैठकीला राहुल गांधी यांनाही बोलवण्यात आले होते. त्या सर्व लोकांनी या यात्रेत सहभागी होण्याचे ठरविले असून देशाची लोकशाही व देश वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला असल्याचेही योगेंद्र यादव यांनी सांगितले.