टीव्ही पत्रकारितेचं वास्तव दाखवणारा तमाशा ‘LIVE’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पत्रकारिता करणं खरंच सोपं नाहीये.. हो खरंच सोपं नाहीये पण गेल्या काही वर्षात एखाद्या निरर्थक बातमी किंवा घटनेचं चावून चोथा होईपर्यंत केलं जाणारं चित्रण न्यूजचॅनल्सवर होत असतं. मग त्या बातमीचा जीव जाईपर्यंत किस पाडला जातो. टीआरपीसाठी वाट्टेल त्या थराला जाऊन बातमीची अतिरंजकता दाखवणाऱ्या न्यूजचॅनल्सना कुठे थांबावं हेच कळत नसतं. हे सगळं सांगण्याची आवश्यकता कारण याच अतिरंजीत मिडीयाचं तंतोतंत पटेल रूचेल असं चित्रण करणारा सिनेमा म्हणजे तमाशा लाईव्ह… तमाशा लाईव्ह आपले डोळे उघडतो आणि मिडीयात चालणाऱ्या या अघोरी बातमीदारीचं डोळ्यात अंजन घालणारं चित्रण घडवतो…

ADVERTISEMENT

माणसाला माणसाची भीती वाटू लागली… या ओळीच आपल्याला या सिनेमाची ओळख करून देतो. शहरात एका मुलीच्या आत्महत्येची घटना घडते.. ही घटना घडते तेव्हा त्याचं फारसं कोणाला सोयरसुतक नसतं. पण एका न्यूजचॅनेलची रिपोर्टर याची बातमी करते आणि ही घटना प्रकाशझोतात येते… या घटनेचं ती रिपोर्टर इतकं बटबटीत चित्रण करते की खिजगणतीतही नसलेलं ते चँनेल टीआरपीच्या ट्रॅकवर सुसाट धावायला लागतं. प्रतिस्पर्धी चँनेल ज्याचा अँकरचा प्राईम टाईम शो जो नंबर १ असतो त्याचा टीआरपी मात्र घसरायला लागतो.. टीआरपीच्या या खेळात आता हा अँकरही या बातमीला घेऊन उतरतो. आणि सुरू होते कुरघोड्यांवर कुरघोडी करणाऱ्याची सुरवात.. एका चँनेलने या घटनेबद्दल एक ब्रेकींग घटना उतरवली की प्रतिस्पर्धी चँनेल त्या ब्रेकींगच्या वरताण दुसरी ब्रेकींग करणार आणि डोंबाऱ्याच्या खेळासारखं आपणच योग्य यापलीकडे या चँनेल्सना काहीच सुचत नाही..

मात्र या सगळ्यात ते पत्रकारीतेच्या मूल्यांना हरताळ फासतात.. घटनेचं गांभीर्य समजून न घेता अतिशय निरर्थक असं डोक्याला बधीर करणारं चित्रण सुरू राहतं आणि समाज केव्हा प्रेक्षक म्हणून आपण हा अतिरंजीत खेळ पाहत बसतो.. याचा शेवट असाच होतो का.. हे असंच सुरू राहतं का यासाठी तमाशा लाईव्ह एकदा तरी पाहायलाच हवा

हे वाचलं का?

तमाशा लाईव्ह हा सिनेमा एका लोकनाट्यासारखा सजवण्यात आलाय. ज्या लोकनाट्यात एक गण,गवळण,सूत्रधार आणि गाण्याच्या मार्फत सूत्रधार कथा पुढे घेऊन जात असतो.. तमाशा लाईव्हही तसाच आखण्यात आलाय.. दोन सूत्रधार ही कथा गाण्याच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहचवतात. आणि ती ही फारच रंजक पद्धतीने ही अतिशय हटके वाटणारी संकल्पना दिग्दर्शक संजय जाधवच्या आयडियाच्या कल्पनेतून आलीय.. संजय जाधव म्हणजे दुनियादारी ही एक ओळख बनलीय.. आणि ती चांगलीही आहे म्हणा पण आता संजय जाधव म्हणजे दुनियादारी आणि तमाशा लाईव्ह ही एक नवीन ओळख या सिनेमाने घडणार आहे. इतका सुंदर सिनेमा संजय जाधवने केलाय..

‘रंग लागला…’ असं का म्हणते आहे सोनाली?

ADVERTISEMENT

या सिनेमाचं सर्वात मोठं यश आणि अतिशय महत्वाचा भाग म्हणजे या सिनेमाचे संवाद अरविंद जगताप मुळातच पत्रकारिता गिरवलेला माणूस त्यामुळे मिडीया क्षेत्रात घडणाऱ्या घटना अचूक हेरून त्या संवादात आणणं हे कसब त्यांनी केलंय.. अरविंद जगतापच्या संवादांनी सिनेमाला एक प्रकारची जान आली आहे..

ADVERTISEMENT

हा सिनेमा संगीताची साथ सोडली तर निरर्थक ठरेल. इतकं या सिनेमात संगीताला अनन्यसाधारण महत्व आहे. अमितराज, पंकज पडघम यांनी या सिनेमातील प्रत्येक प्रसंगाला साजेसं आणि फार उंचीवर घेऊन जाणारी गाणी रचली आहेत.. यात मोलाचा वाटा गीतकार क्षितीज पटवर्धनचा आहे हा ही पठ्ठ्या पत्रकारितेचं शिक्षण घेतलेला असल्याने त्याच्या शब्दाला एकप्रकारची धार आहे आणि ती या सिनेमात पदोपदी जाणवते आहे..

या सिनेमातील कलाकारांची निवड यासाठी एकस्ट्रा स्टार देण्याची गरज आहे… सोनाली कुलकर्णीने शेफालीच्या भूमिकेत कमाल केलीय.. कलाकार एकाच पद्धतीच्या भूमिकेत अडकला तर तो टाईपकास्ट होतो असं म्हणतात. मात्र सोनालीच्या गेल्या काही सिनेमांच्या निवडीवरून लक्षात येतं की ती निरनिराळ्या भूमिका अतिशय आत्मविश्वासाने करतेय.. शेफालीच्या भूमिकेतही तिने तशीच जान ओतलीय.. कुठेही भडक,अतिरंजीत वाटू शकेल अश्या या भूमिकेला अगदी संयमीपणे तीने या भूमिकेला सजवलं आहे.. मी फक्त डान्स नाही तर उत्तम अभिनयही करू शकते हे तिने शेफालीच्या कामातून तिच्या टीकाकारांना सणसणीत उत्तर दिलंय.

सचित पाटील हा उत्तम कलाकार आहे. हे त्याच्या आजपर्यंतच्या भूमिकांवरून लक्षात येतंच पण सचितची आजपर्यंतची सर्वात उत्तम भूमिका असं मी आश्विनच्या भूमिकेबद्दल म्हणीन.. सचित पाटील हा मेहनती कलाकार आहे पण त्याला म्हणावी तशी संधी मिळत नाही.. हा सिनेमा पाहून त्याला संधी न देणाऱ्यांना नक्कीच चुकचुकल्यासारखं वाटेल इतकं नक्की

या दोघांसारखंच या सिनेमाचा खांब आहेत सूत्रधार आणि अश्या अनेक भूमिकांत असलेले सिध्दार्थ जाधव आणि हेमांगी कवी.. मुळात हे दोनही कलाकार अतिशय एनर्जीने भरलेले आहेत. त्यांनी सूत्रधार आणि या कथेशी संबधित अगणित अश्या भूमिकांमध्ये धमाल केली आहे.

भरत जाधव, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांची उत्तम साथ या सिनेमाला मिळाली आहे..

उत्तम निर्मिती,उत्तम संगीत, उत्तम दिग्दर्शन, उत्तम कथा,संवाद,उत्तम सादरीकरण असलेल्या तमाशा लाईव्ह या सिनेमाला मी देतोय ४ स्टार

एका उत्तम विषयाला तितक्याच उत्तम पद्धतीने सादर होणार्या तमाशा लाईव्ह हा सिनेमा नक्कीच एकदा पाहायला हवा…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT