हिंदुत्व आणि निष्ठा : ठाकरे आणि शिंदेंच्या दसरा मेळावा टीझरमध्ये काय आहे फरक?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर यंदा पहिल्यांदाच एकाच बॅनरखाली दोन दसरा मेळावे होत आहेत. यावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. कोर्टाच्या लढाईनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून टीझर लॉंच करण्यात आली आहेत. शिंदे गटाने २९ सप्टेंबरला टीझर आणि पोस्टर्स लाँच केले तर ३० सप्टेंबरला सकाळीच उद्धव ठाकरेंचा दसरा मेळव्याचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला.

ADVERTISEMENT

दोन्ही टीझर फरक काय आहे?

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या भाषणातील आवाज वापरुन शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नाहीतर ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब, आनंद दिघे, आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरला आहे.

‘शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सतत आसमंतात फडकत राहिला पाहिजे,’ या बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनाची आठवण टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करून दिली आहे.

हे वाचलं का?

तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळव्याच्या टीझर शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करण्यात आला आहे. “शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” असं आवाहन या ट्विट आणि टीझरमधून करण्यात आले आहे. टिझरची सुरुवात भगव्या झेंड्यापासून झाली आहे.

सोबत बाळासाहेबांचे फोटो, त्यांच्या सभा आणि सेनेच्या सभांना असलेली गर्दी या टीझरमध्ये दाखवली. विशेष म्हणजे, या टीझरमध्ये निष्ठेवर भर देण्यात आला आहे. भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार असं या टीझरमध्ये म्हटलं आहे. शेवटी उद्धव ठाकरेंच्या आवाजात शिवसैनिकांना साद घालण्यात आली.

ADVERTISEMENT

या दोन्ही टीझरमधला फरक पाहिला तर शिंदेंच्या टीझरमध्ये असलेला दिघेंचा फोटो ठाकरेंच्या टीझरमध्ये नाही. शिंदेंनी टीझरमध्ये बाळासाहेबांचा आवाज वापरला, तर शिवसेनेच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांना आवाहन करतात आहेत. ठाकरेंच्या टीझरमध्ये निष्ठेवर भर दिलाय, तर शिंदे हिंदूत्व, बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचं टीझरमधून सुचवताना दिसतं आहे.

ADVERTISEMENT

शिंदेंनी पोस्टरवर ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’, असे म्हटले आहे, तर ठाकरेंनी टीझर शेअर करताना एक नेता, एक झेंडा, एक मैदान म्हणत ऐतिहासिक दसरा मेळाव्याचं साक्षीदार होण्याचं आवाहन शिवसैनिकांना केले आहे. दसरा मेळाव्याला शिंदे आणि ठाकरे दोन्ही नेते आपआपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी शिवाजी पार्कवर सर्वाधिक गर्दी जमते की बीकेसीवर हे लवकरच स्पष्ट होईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT