फडणवीसांचे लाडके असलेले गोपीचंद पडळकर सतत वादात का असतात?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गोपीचंद पडळकर हे भाजपममध्ये येण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते होते. वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना त्यांनी भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना ऑक्टोबर 2019 या महिन्यात भाजपमध्ये आणलं आणि त्यांची भाजपमधली कारकीर्द सुरू झाली. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय खास आणि विश्वासू मानले जातात. आज घडीला पडळकर चर्चेत असण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी शरद पवारांच्या विरोधात केलेलं वक्तव्य. जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे शरद पवारांच्या हस्ते करण्यात येऊ नये अशी भूमिका घेत पडळकर यांनीच पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला. तसंच शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचारी नेते, स्वार्थी नेते अशी विशेषणं वापरून टीकाही केली. हे फक्त आजचं चित्र नाही तर पडळकर भाजपमध्ये आल्यापासूनच सातत्याने वादग्रस्त ठरले आहेत.

2019 च्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त

ऑक्टोबर 2019 मध्ये गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीला रामराम करून भाजपमध्ये आले. देवेंद्र फडणवीस यांनी माझा वाघ बारामतीतून लढणार असं सांगत त्यांना अजित पवारांच्या विरोधात बारामतीतून तिकिट दिलं. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत लढत दिल्यानंतर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की गोपीचंद पडळकर यांच्यावर ओढवली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना 1 लाख 95 हजारांपेक्षा जास्त मतं मिळून ते विजयी झाले तर पडळकरांना फक्त 30 हजार मतं मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचा उल्लेख वाघ म्हणून केला होता त्या वाघाला पराभवाची धूळ अजित पवारांनी चारली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2019 च्या लोकसभेलाही पराभव

2019 च्या एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उभे होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर कडाडून टीका केली होती. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी पडळकरांचा पराभव केला. पराभव पदरी पडला तरीही गोपीचंद पडळकर यांची लोकप्रियता कमी झाली नाही. मात्र अनेकदा ते अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा कायमच होत असते अगदी तशीच जशी ती आज झाली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

शरद पवारांची तुलना कोरोनाशी

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. ज्यानंतर भाजपवर प्रचंड प्रमाणत टीका झाली. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की गोपीचंद पडळकर यांना त्यांच्याकडून उत्साहाच्या भरात चुकून झालेल्या वक्तव्याची जाणीव झाली आहे मी असं बोलायला नको होतं असं त्यांनी सांगितलं आहे असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागलं होतं.

…तेव्हा हसन मुश्रीफ भडकून काय म्हणाले होते?

शरद पवार यांचा उल्लेख महाराष्ट्राला लागलेले कोरोना असा जेव्हा गोपीचंद पडळकर यांनी केला होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचं एक वक्तव्यही चांगलंच गाजलं होतं. गोपीचंद पडळकर यांनी तोंड सांभाळून बोलावं नाहीतर अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ की पडळकरांना रात्रभर झोप लागणार नाही. एवढंच नाही तर पडळकरांचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस आहेत असाही आरोप त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी केला होता. एवढंच नाही तर पडळकरांच्या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया त्यावेळी राज्यात उमटल्या होत्या.

2013 ते 2018 या कालावधीत गोपीचंद पडळकर भाजपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये भाजप सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. लोकसभेची जागा त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढवली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली होती. 2019 ला भाजपमध्ये परतल्यावर त्यांना बारामतीची जागा मिळाली, ती निवडणूक हरल्यानंतरही विधानपरिषदेची आमदारकी मिळाली त्यामुळे पक्षातल्या अनेकांनाही आश्चर्य वाटलं होतं. त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या एकनाथ खडसेंनीही पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी काय म्हणाले होते पडळकर?

वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी मी मोकळा असल्याने मला पाच वर्षे सालगडी म्हणून ठेवा असं वक्तव्य केलं होतं. सांगली जिल्ह्यात तुम्हाला कुणी मोकळं दिसतं आहे का? मी फक्त श्रीमंत नाही तर गर्भश्रीमंत आहे. बाकीच्या नेत्यांना बँका, सुतगिरण्या, कारखाने अशी कामं आहेत. मला सालगडी म्हणून पाच वर्षे ठेवा, सालगड्याला तुम्ही पगारी ठेवत असाल मला बिनपगारी ठेवा, असं वक्तव्य त्यांनी त्यांच्या भाषणात केलं होतं जे भाषण चांगलंच गाजलं होतं. मात्र सांगलीत त्यांचा पराभव केला तो भाजपच्या उमेदवारानेच.

एकंदरीतच गोपीचंद पडळकर यांची संपूर्ण कारकीर्द पाहिली तर त्यात ते हरूनही लोकप्रियता कमी न झालेले नेते ठरले. शरद पवारांवर आधी केलेली टीका भोवलेली असतानाही पुन्हा एकदा त्यांना भ्रष्टाचारी आणि स्वार्थी म्हणत त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे वाद आणि गोपीचंद पडळकर यांचं नातं कायम असल्याचंच दिसतं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT