महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायम वादातच का अडकतात? वाचा सविस्तर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते. नव्या काळातले आदर्श बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आहेत हे वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांनी अशी वक्तव्यं करून चर्चांचा आणि वादांचा धुरळा […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते. नव्या काळातले आदर्श बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आहेत हे वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांनी अशी वक्तव्यं करून चर्चांचा आणि वादांचा धुरळा उडवून दिला आहे.
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबईबाबत काय म्हटलं होतं?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसले. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ज्यानंतर आता त्यांनी अखेर माफी मागितली.
२०१९ चा पहाटेचा शपथविधी
२१ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पहाटे पार पडलेला हा शपथविधी राजभवनावरच झाला. राष्ट्रपती राजवट एका रात्रीत उठवून राज्यपालांनी या दोघांना शपथ कशी काय दिली? हा प्रश्न सगळ्या राज्याला पडला होता. हे सरकार अवघं ७२ तास चाललं आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं हे आपण पाहिलंच.
हे वाचलं का?
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळीच संघर्षाची ठिणगी
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे नेते के.सी. पडवी हे मंत्री म्हणून शपथ घेत होते. त्यावेळी त्यांनी शपथ घेताना काही ओळी आपल्या मनाने जोडल्या. यावरून राज्यपाल भगत सिंह हे पडवी यांच्यावर चिडले होते. मी सांगतो आहे त्याच भाषेत आणि तेवढीच शपथ घ्यायची आहे. आपल्या मनाची वाक्यं शपथेत घ्यायची नाही असं म्हणत राज्यपालांनी के.सी. पडवी यांना झापलं होतं. एवढंच नाही तर त्यांना शपथ पुन्हा वाचायला लावली होती.
लॉकडाऊनच्या काळात मंदिरं उघडण्यावरून उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं पत्र
कोरोना असल्याने राज्यसह देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्ये काही गोष्टी काही प्रमाणात अटी शर्थींसह सुरू झाल्या. त्यानंतर भाजपने ठाकरे सरकार मंदिरं का उघडत नाही? असा प्रश्न विचारत आंदोलन केलं होतं. त्यावेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण केली होती. राज्यपाल विरूद्ध सरकार हा वाद तेव्हाही रंगला होता.
ADVERTISEMENT
कविता राऊत यांच्या नोकरीवरून महाविकास आघाडीवर टीका
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनील केदार नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे असं वक्तव्य जानेवारी २०२१ मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यावेळीही ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल कोश्यारी हा संघर्ष झाला.
ADVERTISEMENT
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य
महाविकास आघाडी सरकार राज्यात असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सावित्रीबाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं होतं तेव्हा ज्योतिबा फुले १३ वर्षांचे होते. लग्न झाल्यानंतर पुढे या वयातली मुलं काय करतात हे विचारत ते हसले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.
छत्रपती शिवरायांविषयींचं वक्तव्यही वादग्रस्तच
गुरुची महती पटवून देण्याच्या नादात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदारांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता? राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या या वक्तव्यावरूनही चांगलाच वाद निर्माण झाला होता.
महिलेच्या चेहऱ्यावरून मास्क काढल्याचं प्रकरण
पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते काही सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी एका महिलेच्या चेहऱ्यावरचा मास्क राज्यपालांनी स्वतःच्या हाताने खाली ओढला. देशभरात सगळे मास्क लावण्याचं आवाहन करत असतानाचा तो काळ होता. कोरोनाच्या लाटा त्यावेळी महाराष्ट्रात येत होत्या. यावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
या ठळक घटना आणि वाद लक्षात घेतले तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कसे वादग्रस्तच ठरले आणि त्यांच्यावर अखेर माफी मागण्याची वेळ का आली ते लक्षात येतंच.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT