ठाकरे बंधू एकत्र येणार का? दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या आडनावाला एक वेगळं वलय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा, यांची किर्ती अवघा महाराष्ट्र जाणून आहे. त्यांचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहचत असे. त्यांच्या पुढची पिढी म्हणजे त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पुतणे राज ठाकरे. शिवसेनेतल्या अस्वस्थेला कंटाळून राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यानंतर 9 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्रात एक प्रश्न मराठी माणसाच्या मनात कायम आहे तो म्हणजे ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? याचं उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच दिलं आहे.

ADVERTISEMENT

लोकसत्ता या दैनिकाच्या कार्यक्रमातील एका विशेष मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी हाच प्रश्न विचारला. तमाम मराठी माणसाच्या मनात एक प्रश्न तुम्हा दोन बंधूंविषयी आहे. तो प्रश्न हाच आहे की तुम्ही एकत्र येणार का? असा प्रश्न गिरीश कुबेर यांनी विचारला आणि राज ठाकरेंनी त्यावर एकच उत्तर दिलं आणि ते होतं परमेश्वर जाणे! याचाच अर्थ की आम्ही कधी एकत्र येऊ का? हे आत्ता काहीच सांगता येत नाही असं त्यांनी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

राज ठाकरे म्हणतात, नाणार प्रकल्प राज्याबाहेर जाणं परवडणारं नाही!

राज ठाकरे यांचा स्वभाव आक्रमक, राजकीय भाषण करण्याची त्यांची कला ही हुबेहुब बाळासाहेब ठाकरेंसारखीच. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार म्हणून राज ठाकरेंकडेच पाहिलं जात होतं. मात्र शिवसेनेचे उत्तराधिकारी ठरले ते उद्धव ठाकरे. सुरूवातीला राजकारणात नवखे, बाळासाहेबांसारखी शैली नसलेले, शांत स्वभावाचे अशी काही विशेषणं लावून त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र ते राजकारणात चांगलेच मुरले आहेत आणि त्यांचं राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांच्या रोखठोक राजकारणापेक्षा वेगळं आहे हे त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर दाखवून दिलं. याऊलट राज ठाकरे हे आक्रमक, मराठीचा मुद्दा उचलून धरणारे, परप्रांतीयांच्या विरोधात आवाज उठवणारे असे कायम दिसून आले. मात्र त्यांचा राजकीय आवेश, आक्रमकपणा हा आता काहीसा शांत झाला आहे हे गेल्या पंधरा वर्षांमध्ये दिसून आलं आहे. असं असलं तरीही ठाकरे बंधू ज्या ज्या प्रसंगांना एकत्र आले तेव्हा त्याची बातमी झाली. कारण ठाकरे या नावाभोवती असेललं वलयच तसं आहे. तमाम मराठी माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल एक हळवी किनार आहे. त्यातून त्यांना एकत्र पाहण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. तसा प्रयत्नही अनेकदा अनेकांनी करून पाहिला आहे. मात्र दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच आता या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकत परमेश्वर जाणे असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हिंदू हृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे लागली ती कायमचीच. तसंच राज ठाकरेंना लोक मराठी हृदयसम्राट म्हणू लागले होते. अर्थात उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे कधीही अशी उपाधी लागली नाही. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर एक समजूतदार, मुलांच्या पालकांप्रमाणे महाराष्ट्राची जबाबदारी घेणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कौतुक झालं. शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा केंद्रस्थानी राहिला आहे तो मराठी माणूस. मात्र मराठी माणसाला ज्या स्वप्नाची आशा आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ती आशा मात्र पूर्ण होईल असं राज ठाकरेंच्या उत्तरावरून तरी तूर्तास वाटत नाही.

मात्र राजकारण हा असा विषय आहे की इथे कधी काय होईल? कोण कोणाला जाऊन मिळेल हे सांगता येत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघेही जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा दोघांमधून विस्तवही जात नव्हता असाही काळ येऊन गेल्याचं जाणकार सांगतात. मात्र राजकीय प्रगल्भता आणि त्यानंतर आलेले विविध राजकीय अनुभव याद्वारे दोघांमधली कटुता काहीशी कमी झाली असंही बोललं गेलं. जेव्हा जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा तेव्हा हे दोन बंधू एकत्र येणार का? असा विषय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात झाला मात्र हे दोघे एकत्र आले नाहीत. आगामी काळातही हे दोघे एकत्र येतील का? याचं उत्तर काळच देऊ शकतो. सध्या तरी असं काही होईल की नाही हे परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणत राज ठाकरेंनी ही शक्यता नाकारली आहे. मात्र महाराष्ट्राची हे दोन बंधू एकत्र येण्याची आशा मात्र अद्याप कायम आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT