पेरुच्या शेतीतून गवसला यशाचा मार्ग, नगरच्या तरुण शेतकऱ्याच्या धाडसाची सर्वत्र चर्चा
– रोहित वाळके, अहमदनगर प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्यातला शेतकरी हा दुष्काळामुळे संपूर्णपणे पिचला आहे. कधी सुका दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. परंतू महाराष्ट्रात आजही अनेक शेतकरी परिस्थितीवर मात करुन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत वेगळे प्रयत्न करत आहेत. अहमदनगरच्या दैठणे गुंजाळ येथील शेतकरी बाळासाहेब गुंजाळ यांनी पेरुच्या […]
ADVERTISEMENT

– रोहित वाळके, अहमदनगर प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातला शेतकरी हा दुष्काळामुळे संपूर्णपणे पिचला आहे. कधी सुका दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. परंतू महाराष्ट्रात आजही अनेक शेतकरी परिस्थितीवर मात करुन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत वेगळे प्रयत्न करत आहेत.
अहमदनगरच्या दैठणे गुंजाळ येथील शेतकरी बाळासाहेब गुंजाळ यांनी पेरुच्या शेतीमधून दीड महिन्यांत ४० लाखांचं उत्पन्न कमावलं आहे.
इतरांपेक्षा वेगळा विचार करुन फळशेतीकडे वळलेल्या गुंजाळ यांच्या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. गुंजाळ यांनी १० एकर जमिनीत तैवान जातीच्या पेरुच्या ८ हजार झाडांची लागवड केली. यासाठी गुंजाळ यांना ८ लाखांचा खर्च आला. या पेरुला दुबई, बांगलादेश, कोलकाता, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात मागणी असते.
४०० ते ९०० ग्रॅम वजनाचा हा एक पेरु असतो. खायला मऊ आणि कमी गोड असल्यामुळे शहरांमध्ये या जातीच्या पेरुला चांगली मागणी असते. तसेच या जातीचं पेरुचं फळ हे टिकण्याची क्षमता जास्त असल्यामुळे लांबच्या बाजारपेठेत पाठवत असताना उत्पन्नात घट होणे किंवा उत्पादन खराब होण्याची फारशी भीती नसते. तसेच गुंजाळ यांनी या पेरुच्या बागेसाठी रासायनिक खताऐवजी शेणखत आणि कोंबडी खताचा वापर केला.
गावात पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे एवढ्या मोठ्या जागेवरील पेरुच्या बागेला पाणी कसं द्यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यासाठी त्यांनी शेतातच ५ कोटी लिटर पाणी साठेल एवढं मोठं शेततळं उभारुन ठिबक सिंचनाद्वारे पेरुला पाणी मिळेल याची काळजी घेतली. गुंजाळ यांच्या या अथक प्रयत्नांना फळंही पेरुसारखं गोडच आलं. पेरुची विक्री करुन उत्पन्न चांगलं मिळाल्यामुळे सध्या पंचक्रोशीत गुंजाळ यांची चर्चा आहे. गुंजाळ यांनी वापरलेल्या इस्रायली तंत्रज्ञानाची माहिती घेऊन अनेक शेतकऱ्यांना आता पेरुच्या लागवडीचा निर्णय घेतला आहे.
सध्या अनेक लोकं गुंजाळ यांच्या पेरुच्या बागेला भेट देण्यासाठी येत आहेत. पेरुच्या उत्पादनातून गुंजाळ यांना चांगलाच आर्थिक फायदा झाल्यामुळे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्याला नक्कीच फायदा होऊ शकते असंही गुंजाळ यांनी मुंबई तक शी बोलताना सांगितलं.