लोकलवर टांगती तलवार, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वांसाठी सुरू झाली. सुरूवातीचे 7 – 8 दिवस कोरोना रुग्णसंख्याही कमीच होती. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांसाठी पूर्णवेळ लोकल सुरू होणार अशी चिन्ह दिसू लागली होती. मुंबईकरही त्यामुळे काहीसे खुश होते, पण 9 – 10 तारखेपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आणि सुरू असलेली लोकलही आता बंद होते का? अशी स्थिती निर्माण झाली.

याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. ते असं म्हणालेले की, ‘सध्या सुरू असलेली रुग्णवाढ ही रेल्वे प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे होत आहे, असे ठोस सांगता येणार नाही. आम्ही चाचण्यांची संख्या देखील वाढवली आहे. त्यामुळेही संख्या वाढू शकते’. शिवाय ते असंही म्हणालेले की, ‘सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलच्या वेळा वाढवण्यात आल्याने रूग्ण संख्येत वाढ होत आहे, का याचा आढावा प्रशासन घेत आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत हा आढावा सुरू राहणार असून तोपर्यंत लोकलच्या वेळा वाढवू नयेत, असे निर्देश रेल्वेला दिले आहेत’. पण मुंबईत 10 फेब्रुवारीला 558 रुग्ण आढळले आणि त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत वाढच होत राहिली. अगदी गेल्या 24 तासांतही पुन्हा 736 रुग्ण आढळून आले.

त्यामुळे आता 22 फेब्रुवारीच्या बैठकीत मुंबई लोकल पूर्णवेळ सुरू होणार, असा निर्णय घेतला जाणं नाहीसं कठिण दिसत आहे. शिवाय सध्या सुरू असलेल्या मर्यादित कालावधीच्या लोकलवरही फेरविचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पूर्णवेळ धावणारी लोकल लवकर पाहता येणार नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरीकडे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू होईल का याबाबतही प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे. कारण मुंबईतले अंधेरी, चेंबुर, मुलुंड आणि बोरिवलीमध्ये सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एम वेस्टमधल्या इमारतींना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कुर्ल्यातलं नेहरु नगर, टिळक नगर, विक्रोळी आणि घाटकोपर इथेही रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ही उपनगरं आता कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय, बांद्रा, खार, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व या भागांमध्येही पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोन जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण 550 इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

मुंबईत यापूर्वी दिवसाला दोन ते अडीच हजारापर्यंत करोनारुग्ण आढळत होते. ती संख्या फेब्रुवारीमध्ये 300 च्या टप्प्यात आली होती. त्यानंतर, 1 फेब्रुवारीपासून लोकलसेवा खुली केल्यानंतर गर्दी वाढली. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरण्याचं प्रमाण वाढत गेलं आणि 3 फेब्रुवारीला 334 असलेली सक्रिय रुग्णांची संख्या नंतर 600 च्याही वर पोहोचली. 14 तारखेपासूनचा आढावा घेतला तर रुग्णसंख्येत सातत्याने चढ-उतार होतोना दिसत आहे.

ADVERTISEMENT

14 तारखेपासूनची मुंबईतली रुग्णसंख्या :

14 फेब्रुवारीला मुंबईत 645 कोरोना रुग्ण 4 जणांचा मृत्यू

15 फेब्रुवारीला मुंबईत 493 कोरोना रुग्ण 3 जणांचा मृत्यू

16 फेब्रुवारीला मुंबईत 461 कोरोना रुग्ण 3 जणांचा मृत्यू

17 फेब्रुवारीला मुंबईत 721 कोरोना रुग्ण 3 जणांचा मृत्यू

18 फेब्रुवारीला मुंबईत 736 कोरोना रुग्ण 4 जणांचा मृत्यू

त्यामुळे मुंबईतली कोरोना रुग्णसंख्या आता 3.16 लाखांवर पोहोचली आहे. तर, एकूण मृत्यू 11 हजारांच्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे गुरूवारी मुंबई महापालिकेने काही नवे निर्बंधही लागू केले असून ही वाढ अशीच होत राहिली तर अमरावती, यवतमाळनंतर मुंबईतही लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागू शकतो.

हा व्हिडिओ देखील पहा…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT