महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, शिष्य आनंद गिरी यांना घेतलं गेलं ताब्यात

जाणून घ्या काय म्हटलं आहे आनंद गिरी यांनी?
महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, शिष्य आनंद गिरी यांना घेतलं गेलं ताब्यात

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांना हरिद्वारमधून ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस एडीजी लॉ एंड प्रशांत कुमार यांनी आनंद गिरी ला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. Uptak ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

प्रशांत कुमार म्हणाले, 'अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यश्र महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती शिष्याने दिली. आयजी तिकडे गेले होते त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरवाजा आतून बंद होता. शिष्यांनी दरवाजा ठोठावला पण नरेंद्र गिरी यांनी काही प्रतिसाद दिला नाही. हा दरवाजा नंतर तोडण्यात आला. ज्यावेळी महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली.'

'या सुसाईड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी आणि इतर दोन शिष्यांच्या विरोधात काही आरोप केले आहेत. नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये असं म्हटलं आहे की माझ्या मृत्यूला हेच लोक जबाबदार आहेत.' या सगळ्यानंतर आनंद गिरी यांना हरिद्वारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.

याआधी महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी आज तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं होतं की ते हरिद्वारमध्ये आहेत. त्यांनी हेदेखील सांगितलं की हे खूप मोठं षडयंत्र आहे, पोलीस अधिकारीही मिळालेले आहेत. मठाची संपत्ती विकण्यासाठी जे उत्सुक आहेत असे लोक या कटात सहभागी आहेत. एक कट रचून मला गुरूजींपासून (नरेंद्रगिरी) वेगळं करण्यात आलं. या प्रकरणात मला अडकवलं जातं आहे. या प्रकरणात मोठे भूमाफियाही सहभागी आहेत.

आनंद गिरी यांनी हे देखील सांगितलं की महंत नरेंद्र गिरी हे कोणत्याही मानसिक ताण-तणावात नव्हते. त्यांना त्रास दिला गेला आणि माझं नाव सुसाईड नोटमध्ये लिहिण्यास भाग पाडलं गेलं. मी जर दोषी असेन तर जी मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मठाच्या संपत्तीपासून कुणाला फायदा होणार आहे, मठाचे पैसे कुठे गेले हे कळलं पाहिजे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. मला संपवण्यासाठी हा कट रचला गेला आहे असंही आनंद गिरी यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in