
राज्यात 2018 आणि 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. फडणवीसांनी केलेल्या मागणी मात्र, नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिकांनी परीक्षा घोटाळ्यावर भाष्य केलं.
टीईटी परीक्षा घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याचसंदर्भात नवाब मलिकांना प्रश्न विचारण्यात आला. या मुद्द्यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले,'तपास सीबीआयकडे देऊन प्रकरण दाबून टाकायचं आहे का? 2016 पासून महाराष्ट्रात फर्जिवाडा सुरू आहे. त्याच सगळ्या कंपन्या आहेत. कौस्तुभ धौसे नावाचा डिजिटल दलाल महाराष्ट्रात होता, ज्याने व्यापमं कंपन्यांच्या माध्यमातून भरती करण्याचं काम केलं. तपास होत आहे, होऊ द्या. सगळंच सीबीआयकडे पाठवून थंड बस्त्यात टाकायची इच्छा आहे का?", असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.
"या प्रकरणाचे धोगदोर नागपूरमधील अनेक लोकांशी जोडलेले आहे, असं आम्हाला वाटतं. या प्रकरणाशी अनेकांचं नाव जोडलेलं आहे. 2016पासून आजपर्यंत ज्या कंपन्यांनी घोटाळा केला आहे. जे लोक यात सहभागी आहेत, त्यांना सोडणार नाही. अशा कंपन्यांच्या माध्यमातून भरती केली जाणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. टाटा कन्सल्टेशन सारख्या नामवंत कंपन्यांमार्फत किंवा विभाग परीक्षा घेण्यास सक्षम असेल, तर विभागाने घ्यावी, याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. यापुढे पारदर्शक पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी प्रयत्न केले जातील", असं नवाब मलिक म्हणाले.
"व्यापमं घोटाळ्यातील कंपन्या 2016 पासून महाराष्ट्रात काम करत होत्या. प्रकरणाचा तपास केला जात आहे. देवेंद्रजी, घाबरू नका. जो कुणी यात गुन्हेगार असेल, त्याला शिक्षा दिली जाईल. केंद्रीय यंत्रणांकडे देऊन हे प्रकरण दाबू इच्छित आहात का? विश्वास ठेवा, याच पोलीस खात्याचं आपण गृहमंत्रीपद सांभाळलं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. योग्य कारवाई केली जाईल", असं म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली.
टीईटी परीक्षा घोटाळ्याबद्दल फडणवीस काय म्हणाले आहेत?
देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यात म्हटलं आहे, 'टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज (20 डिसेंबर) आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढलं', असं फडणवीस म्हणाले आहेत.
'आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी! सीबीआय चौकशी झाली, तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्या खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा", अशी मागणी फडणवीसांनी केलेली आहे.