एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीच्या अडचणी वाढल्या; पुण्यात आणखी दोन गुन्ह्यांची नोंद

किरण गोसावीविरुद्ध पुण्यात एकूण तीन गुन्हे दाखल : लष्कर आमि वानवडी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे
आर्यन खानसोबत घेतलेल्या या सेल्फीमुळे किरण गोसावी चर्चेत आला.
आर्यन खानसोबत घेतलेल्या या सेल्फीमुळे किरण गोसावी चर्चेत आला.

आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या किरण गोसावीविरुद्ध पुण्यात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गोसावीविरोधात पुण्यात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

नोकरी लावून देतो असे सांगून पुण्यातील एका तरुणांची किरण गोसावीने आर्थिक फसवणूक केली होती. किरण गोसावी आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुरुवारी पहाटे त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

दरम्यान, किरण गोसावीची पोलीस कोठडीत रवानगी झाल्यानंतर पुण्यातील लष्कर आणि वानवडी पोलीस ठाण्यामध्ये आर्थिक फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे किरण गोसावी विरोधात पुण्यात एकूण तीन गुन्हे दाखल आहे. गुन्ह्यांची संख्या वाढल्याने किरण गोसावीचा कोठडीतील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

किरण गोसावी फसवणुकी प्रकरणी फरासखाना पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी माहिती दिली. पुण्यातील कसबा पेठ परिसरात राहणाऱ्या चिन्मय देशमुख या तरुणाला मलेशियात नोकरी लावून देतो, असं गोसवीने सांगितलं होतं. त्यासाठी त्याने वेळोवेळी असे मिळून तीन लाख रुपये घेतले होते. त्या दरम्यान तो तरुण मलेशियात गेला, पण तिथे गेल्यावर त्याला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

चिन्मय पुण्यात परतला. त्यानंतर त्याने किरण गोसावी विरोधात फसवणुकीची तक्रार 2018 च्या दरम्यान फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. या प्रकरणी त्याचा तपास सुरू असतानाच मध्यंतरी एका प्रकरणी किरण गोसावीचा फोटो प्रसारमाध्यमांमध्ये आल्यावर पुन्हा चिन्मय याने आमच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

याच काळात त्याच्यासोबत काम करणारी सहकारी महिलेला ताब्यात घेण्यात आलं. तसेच 28 ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास कात्रज येथील लॉजवरून गोसावीला ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आज (30 ऑक्टोबर) शहरातील वानवडी आणि लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीच्या दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. गोसावीविरुद्ध पुणे शहरात तीन गुन्हे दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in