Advertisement

बंगालमधील हिंसाचारात 8 जणांचा हकनाक बळी, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

बंगालमधील बीरभूम गावात उसळलेल्या हिंसाचारात तब्बल 8 जणांचा हकनाक बळी गेला आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलंय.
violence in bengal birbhum what happened on that night full story by eyewitnesses
violence in bengal birbhum what happened on that night full story by eyewitnesses(फोटो सौजन्य: ANI)

बीरभूम (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार भडकला आहे. येथे संतप्त जमावाने सुमारे डझनभर घरे पेटवून दिली. या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. राज्यात होत असलेल्या राजकीय हिंसाचारावरून भाजपने ममता सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांचे शिष्टमंडळ आज रामपूरहाटमधील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयानेही या प्रकरणी स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. जाणून घेऊया रामपूरहाटमध्ये हिंसाचार का पसरला आणि तेथील लोकं आता स्थलांतर का करत आहेत?

हिंसाचार कसा पसरला?

बीरभूमच्या रामपूरहाटमध्ये झालेल्या हिंसाचारामागे टीएमसी नेत्याच्या हत्येचे कारण असल्याचे बोलले जात आहे. TMC पंचायत नेते भादू शेख यांची सोमवारी रामपूरहाटमध्ये हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री त्याच्यावर बॉम्ब फेकण्यात आला होता. यानंतर संतप्त जमावाने डझनहून अधिक घरांना आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं काय?

या अपघातातून वाचलेल्या नजीरा बीबीने सांगितले की, आम्ही झोपलो होतो. त्यानंतर आम्हाला स्फोटांचे आवाज ऐकू आले. काही लोकांनी आमच्या घरांना आग लावली. मी पळून जाण्यात यशस्वी झालो. पण मला माहित नाही की माझ्या बाकीच्या कुटुंबाचे काय झाले?

आग कोणी लावली हे माहीत नाही - प्रत्यक्षदर्शी

त्याचवेळी मरजिना बीबीने सांगितले की, आम्ही त्या रात्री हॉस्पिटलमधून परत आलो होतो. त्यावेळी घरांना आग लागल्याचे आम्ही पाहिले. सोना शेख यांच्या घरालाही आग लागली होती. त्यांचे घर आमच्या शेजारीच आहे. रात्रीचे 9 वाजले होते तेव्हा. त्यावेळी तिथे पोलीस हजर नव्हते. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. स्फोट झाला तेव्हा आतून लोकांचा ओरडण्याचा आवाज येत होता. हा स्फोट गॅस सिलेंडरचा होता. घराला बाहेरुन आग लावण्यात आली होती. पण ही आग कोणी लावली हे आम्हाला माहीत नाही. असं मरजीना यांनी सांगितलं.

पोलीस काय म्हणाले?

बीरभूम घटनेबाबत बंगालचे डीजीपी मनोज मालवीय म्हणाले की, 'हे वैयक्तिक शत्रुत्वाचे प्रकरण असू शकते. आगीचे कारण तपासले जात आहे. जर याचा संबंध टीएमसी नेत्याच्या मृत्यूचा बदला घेण्याशी असेल तर ते परस्पर शत्रुत्वामुळे असू शकते. हा राजकीय हिंसाचाराशी संबंधित विषय नाही.'

अनेकांनी गावातून काढला पळ

हिंसाचारानंतर बीरभूम जिल्ह्यातील बागुटी गावात सर्वत्र शांतता पसरली होती. पुन्हा हिंसाचार पसरू नये, अशी भीती लोकांच्या मनात आहे. यापूर्वी हिंसाचारात ठार झालेला भादू शेखचा भाऊ नूर अली गाव सोडण्याच्या तयारीत आहे. नूर अली म्हणाले, 'काल माझ्या भावाची हत्या झाली, एकाला अटक करण्यात आली आहे. माझ्या कुटुंबात महिला आहेत. मी इथे भीतीच्या छायेखाली राहू शकत नाही. मी कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. त्यामुळे मी आता माझ्या उर्वरित कुटुंबासह बाहेर जात आहे.'

त्याचवेळी गावातील आणखी एका महिलेने सांगितले की, आम्ही आमचे घर सोडून जात आहोत. आम्हाला आमच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. माझ्या भावाची हत्या झाली. पोलीस बंदोबस्त ठेवला असता तर ही घटना घडली नसती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in