शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत काय घडलं? सुधींद्र कुलकर्णी यांनी दिलं उत्तर

जाणून घ्या मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुधींद्र कुलकर्णींनी काय म्हटलं आहे ?
शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत काय घडलं? सुधींद्र कुलकर्णी यांनी दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी राष्ट्र मंचच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत अनेक नेत्यांची उपस्थिती होती. शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं? मोदींविरोधात तिसऱ्या आघाडीची ही सुरूवात आहे का? शरद पवार हे पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात स्वतःला आजमावू पाहात आहेत का? असे अनेक प्रश्न चर्चिले गेले. यशवंत सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी याबाबत माहितीही दिली. या बैठकीत सुधींद्र कुलकर्णीही उपस्थित होते. सुधींद्र कुलकर्णी यांनी याबाबत काय सांगितलं जाणून घेऊ.

या बैठकीचा अजेंडा काय होता?

मंगळवारी शरद पवार यांच्या घरी झालेली बैठक ही विरोधी पक्षांची बैठक नव्हती. ही बैठक राष्ट्र मंच नावाची संघटना आहे त्यांच्यातर्फे ही बैठक बोलवण्यात आली होती. शरद पवार हे मेंटॉर अर्थात मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ही बैठक त्यांच्या निवासस्थानी घेतली गेली. दुसरी आघाडी, तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी बैठक होती अशीही चर्चा होती. मात्र असंही काही नव्हतं. भाजप किंवा काँग्रेसशिवाय पर्याय देण्यासाठी ही बैठक नव्हती. मोदींच्या विरोधात व्यूहरचना करण्यासाठी ही बैठक होती का तर त्याचं उत्तरही नाही असंच आहे.

या बैठकीचं मुख्य उद्दीष्ट सांगतो. यशवंत सिन्हा हे तीस वर्षांपासून अधिक काळ भाजपचे नेते होते. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर यशवंत सिन्हा भाजपमधून बाहेर पडले. त्यांनी राष्ट्र मंच संघटना स्थापन केली. आता काही दिवसांपूर्वीच त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी नॉन पार्टी बट पॉलिटिकल असा एक राष्ट्र मंच स्थापन केला. राष्ट्रीय समस्यांबद्दल विचार करण्यासाठी आणि अजेंडा तयार करण्यासाठी हा मंच स्थापन करण्यात आला आहे. मुंबईतही या मंचाच्या अनेक बैठका झाल्या आहेत. कोव्हिड काळ असल्याने मागच्या दीड वर्षात राष्ट्रीय मंचाची बैठक होऊ शकली नाही. ती घ्यायची ठरली त्यावेळी शरद पवार यांनी सांगितलं की दिल्लीत बैठक घ्या आणि माझ्या निवासस्थानी बैठक घ्या. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी याची वेगवेगळ्या प्रकारे बातमी दिली. मीडियाला या निमित्ताने चांगला विषय मिळाला. मी़डियाने त्यांच्या पद्धतीने अंदाज बांधले. मात्र बैठक हे देशातल्या गंभीर प्रश्नांबाबत विचार करण्यासाठी झाली. विविध पक्षांचे नेते आणि राजकीय कार्यकर्ते अशा लोकांची बैठक झाली. या बैठकीत खूप चांगली आणि सकारात्मक बैठक झाली.

शरद पवारांनी महाविकास आघाडीसारखा प्रयोग महाराष्ट्रात केला, त्यामुळे ही बैठक जेव्हा पवारांच्या घरी झाली तेव्हा त्या बैठकीची चर्चा होणारच. भाजपच्या विरोधात जे लढायला तयार आहेत त्यांना एकत्र बोलवण्याची तयारी सुरू झाली आहे असं लोकांना वाटलं त्याबद्दल काय सांगाल?

शरद पवार यांच्या घरी बैठक झाली कारण राष्ट्र मंचाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवारांचा सहभाग झाला आहे. यशवंत सिन्हा यांनी २०२० मध्ये देशव्यापी शांती यात्रा सुरू झाली होती. त्याला हिरवा झेंडा दाखवणारे शरद पवार होते. शरद पवार यांना असं वाटतं की देशासमोर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना पर्याय शोधण्यासाठी ठोस उपाय गरजेचे आहेत. त्या अनुषंगाने पुढाकार घेणारे लोक हवेत.

देशासमोर आत्ता सर्वात ज्वलंत प्रश्न आहे तो कोव्हिडचा. कोव्हिडमुळे लोकांचे जे हाल झाले आहेत ते आपण पाहिले आहेत. तसंच ही सगळी परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार कमी पडलं आहे. मोहन भागवत यांनीही त्यांच्या भाषणात असं म्हटलं आहे की सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे. कोव्हिड क्रायसिससोबतच देशात आर्थिक संकटही आहे. देशातल्या बेरोजागारीचे आकडे तर धक्कादायक आहेत. CMIE ने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय स्वातंत्र्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी कधीही नव्हती.

दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल स्वस्त आहे. तरीही पेट्रोल डिझेलवरच्या टॅक्सच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये सरकार घेतं आहे. त्यांचं आर्थिक अपयश लपवण्यासाठी दरवाढ केली जाते आहे. आणखी एक ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा. हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेशचे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. जगातलं हे सर्वात मोठं आंदोलन कोव्हिड काळातही कायम राहिलं आहे. या सगळ्या समस्या लक्षात घेऊन बैठक बोलवण्यात आली होती.

शरद पवार यांनी या बैठकीत अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलं. मंगळवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्ष नव्हता, शिवसेना नव्हती. त्याबाबत शरद पवार असं म्हणाले की राष्ट्र मंच ही देशाचे प्रश्न मांडणारी संघटना आहे. पुढच्या काळात जी बैठक घेतली जाईल त्या बैठकीला शिवसेना आणि काँग्रेस पक्षांच्या प्रतिनिधींनाही बोलवायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यांचं हे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे.

यशवंत सिन्हा हे तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत, संजय सिंग आपचे आहेत, जयंत चौधरी होते अशात मंगळवारच्या बैठकीतून शिवसेना आणि काँग्रेस दूर का होते?

मंगळवारच्या बैठकीत काही टेक्निकल कारणांमुळे नेते येऊ शकले नाहीत. मनिष तिवारी आणि कपिल सिब्बल यांना बोलवण्यात आलं होतं. पण ते पोहचू शकले नाहीत. शिवसेनेला बोलवलं गेलं नव्हतं हे खरं आहे. मात्र शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे यापुढे देशासमोरच्या प्रश्नांबद्दल विचार कऱण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आणि जनआंदोलन उभं करण्यासाठी या सगळ्या पक्षांना सोबत घेणार आहोत. शरद पवारांनी हे वक्तव्य केलं त्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे कारण त्यांनी महाविकास आघाडीसारखा अशक्य वाटणारा प्रयोग करून दाखवला. शरद पवार हे प्रादेशिक नेते नाहीत, ते राष्ट्रीय नेते आहेत. आज घडीला देशात सक्रिय असलेल्या वरिष्ठ राजकारण्यांपैकी शरद पवार एक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे राष्ट्रमंचाच्या सगळ्या कार्यक्रमांना दिशा मिळाली आहे.

तिसऱ्यांदा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली. या भेटींचा अर्थ नेमका काय काढायचा?

मंगळवारी झालेल्या बैठकीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकींमध्ये झालेल्या विषयांवर काही चर्चा झाली नाही. काल झालेल्या बैठकीची पूर्वतयारी दोन आठवड्यांपूर्वी झाली होती. शरद पवार देशातले सर्वात जास्त अनुभवी नेते आहेत. तिसऱ्याने काहीतरी सांगितलं म्हणून ते काहीतरी ठरवतील असं नाही.

राजकीय बैठक नव्हती असं तुम्ही म्हणत आहात, मात्र ती मोदींच्या विरोधात नव्हती असं तुम्ही का म्हणत आहात?

देशात असे अनेक ऑर्गनायझेशन आहेत जे देशांमधल्या प्रश्नांबाबत चर्चा करतात. महिला संघटन असो, किसान आंदोलन असो किंवा इतर संस्था असोत जे प्रश्नांवर चर्चा करतात. राष्ट्र मंचामध्ये पक्षांशी जोडलेले नेते आहेत आणि पक्षांशी जोडले गेलेले नाहीत असेही लोक आहेत. नॉन बीजेपी पक्ष हे फक्त राष्ट्र मंच या संघटनेच्या मंचावर एकत्र आले आहेत. मात्र या बैठकीत मोदी विरोधी चर्चा झाली नाही.

राष्ट्रमंच ही राजकीय संघटना आहे. त्यामुळे 2024 चा विषय होता का? तर नक्कीच आहे. कारण देशाला एक सक्षम पर्यायाची गरज आहे हे आम्हाला ठाऊक आहे. 2014 आणि 2019 मध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मतं दिली त्यांनाही सक्षम पर्याय हवा आहे. आम्ही खूप विश्वासाने भाजपला मतं दिली. मात्र सात वर्षांनंतर देशासमोरचे प्रश्न पाहात असताना लोकांना हे वाटू लागलं आहे की कुठेतरी आपला विश्वासघात झाला आहे. पश्चिम बंगालची निवडणूक पार पडली. ममता बॅनर्जींना आणि तृणमूल काँग्रेसला हरवण्यासाठी जे काही केलं ते देशानं पाहिलं. तरीही तृणमूलचा पराभव भाजपला करता आला नाही. उलट जास्त बहुमताने ममता बॅनर्जी जिंकून आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या प्रचाराचा उपयोग झाला नाही. उत्तर प्रदेशातही ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपचा पराभव झालेला आहे. दीड वर्षांपूर्वी दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा विजय झाला. देशात संक्रमण काळ सुरू झाला आहे. लोकांना वाटतं की सक्षम पर्याय हवा. तो पर्याय दिसत नाहीये कारण विरोधी पक्ष एकत्र झालेले नाहीत.

मंगळवारी झालेल्या बैठकीतही लोकांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. ती चर्चा होत नाही तोपर्यंत प्रश्न सोडवण्याचं उत्तर मिळू शकणार नाही. तसंच पर्याय कसा उभा करायचा तो लोकांनी का स्वीकारायचा याचं कारण मिळू शकणार नाही. 2024 ची व्यूहरचना मंगळवारच्या बैठकीत झाली नाही. मात्र लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील त्यासाठी एकत्र येण्यावर चर्चा झाली.

मंगळवारच्या बैठकीत यशवंत सिन्हा यांनी महत्त्वाचं वाक्य बोलून दाखवलं ते असं होतं की ते म्हणाले 'मोदी मुद्दा नहीं, देशके सामने जो मुद्दे हैं वह मुद्दा है' त्यांचं हे वाक्य बैठकीचं सार सांगणारं आहे असं मला वाटतं.

2024 च्या वेळी पर्याय शोधण्याबाबतही चर्चा झाली हे तुम्ही मान्य केलं यालाच अनुसरून एक प्रश्न विचारतो आहे की ज्या ठिकाणी भाजपसोबत एकास एक लढत झाली आहे खासकरून प्रादेशिक पक्षांसोबत असताना भाजपचा पराभव झाला. अशा स्थितीत उत्तर प्रदेश निवडणूक येते आहे आता राष्ट्र मंच भाजपविरोधात फूट पडू नये म्हणून प्रयत्न करणार आहे का?

मंगळवारच्या बैठकीत 2024 बाबत चर्चा झाली नाही. पण जनजागृती करण्यासाठी आज जे काही करायचं आहे तो बैठकीचा मुख्य मुद्दा होता. लोकांसमोर असलेले जे प्रश्न आहेत त्याकडे राजकीय पक्ष आणि बुद्धिजिवी त्यांना एकत्र घेऊन एक व्यापक जनजागृती कऱणं हा विषय होता. 2024 ला तीन वर्षे अद्याप बाकी आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर देशाचं लक्ष लागलं आहे. कालच्या बैठकीतही रालोदचे अध्यक्ष जयंत चौधरी होते. समाजवादी पार्टीचे घनश्याम तिवारी होते. उत्तर प्रदेशात कुशासन सुरू आहे हे भाजपच्या लोकांनाही ठाऊक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन झालं तर त्याचा मोठा संदेश देशात जाईल. मात्र राष्ट्रमंचच्या बैठकीत याबाबत काही चर्चा झालेली नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in