राज ठाकरेंना का घ्यावी लागतेय 'उत्तर' सभा.., भोंग्यावरुन मनसेमध्ये नेमकं चाललंय काय?

राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या बाबत घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेमध्ये संभ्रम पसरला असल्याचं दिसतं आहे. त्यामुळेच आता राज ठाकरे हे आता तात्काळ दुसरी सभा घेणार आहेत.
राज ठाकरेंना का घ्यावी लागतेय 'उत्तर' सभा.., भोंग्यावरुन मनसेमध्ये नेमकं चाललंय काय?
why raj thackeray hold an immediate public meeting what exactly is going on in mns from loudspeaker issue on mosqueफाईल फोटो, सौजन्य: MNS Adhikrut

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याला शिवाजी पार्कवरुन केलेल्या भाषणात कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, जिथे कुठे मशिदींवर भोंगे लावून अजान सुरु असेल तिथे त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि त्यावर हनुमान चालीसा लावायचा. खरं म्हणजे राज ठाकरेंचा हा सरळसरळ आदेशच आहे. पण असं असताना देखील मनसे पक्षातच राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन किंवा भूमिकेवरुन नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे विरोधक देखील त्यांच्यावर या मुद्दावरुन सडकून टीका करत आहेत. याच सगळ्या गोष्टींना उत्तर देण्यासाठी आता राज ठाकरे 9 एप्रिल रोजी ठाण्यात 'उत्तर'सभा घेणार आहेत.

खरं म्हणजे राज ठाकरे यांनी एकदा आदेश दिला की, तो मनसैनिकांसाठी अंतिम असतो. पण मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेवरुन मनसेमध्येच चलबिचल पाहायला मिळत आहे. अशावेळी या सगळ्याला 'उत्तर' देण्यासाठी राज ठाकरे हे पुन्हा ठाण्यात सभा घेणार आहेत.

सगळ्यात आधी जाणून घेऊयात उत्तर सभेबाबत मनसेने काय भूमिका घेतली आहे:

राज ठाकरे हे ठाण्यात उत्तर सभा नेमकी का घेणार आहेत याबाबत मनसेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन माहिती दिली आहे.

'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांचे ढोंग उघडकीस आणून त्यांना सणसणीत आणि खणखणीत 'उत्तर' देण्यासाठी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची 'उत्तर'सभा! शनिवार दि. ९ एप्रिल, सायं. ६.३० वा.' असं मनसेने जाहीर केलं आहे.

आदेशाची धार बोथट झाली?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या करिष्माला काहीशी उतरती कळा लागल्याचं मागील काही वर्षात पाहायला मिळत आहे. सलग दोन विधानसभा निवडणुकीत मनसेचा अवघा 1 आमदार निवडून येत आहे. असं असलं तरी राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक मोठं नेतृत्व आहे. अनेक तरुण त्यांच्या पक्षाशी जोडलेले आहेत. पण असं असताना भोंग्यांच्या मुद्द्यावरुन ज्या पद्धतीने मनसेने दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत त्यावरुन पक्षात सारं काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे.

याआधी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर आंदोलनं उभी केली होती. त्यांच्या एका आदेशासरशी महाराष्ट्रातील लाखो तरुण हे उभे ठाकत होते. मात्र, असं असताना गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी जो आदेश दिला त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसतं आहे.

राज ठाकरे यांचं वलय पाहता आतापर्यंत तरुणाईने प्रत्येक आंदोलनात त्यांना भरभरुन साथ दिली. पण गुढीपाडवा मेळाव्यात ज्या पद्धतीने त्यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत त्याला मनसेतच काहीसा विरोध असल्याचे दिसून येत आहे.

यामागे काही कारणं देखील आहेत. मनसेचे असे अनेक नगरसेवक आहेत की ज्यांना आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी देखील मतदान केलं आहे. पण राज ठाकरेंच्या नव्या आदेशामुळे हे मतदार दुखावले जाण्याची अधिक शक्यता आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी राज ठाकरेंचा आदेश पाळला गेला नसल्याचं दिसतं आहे.

दुसरीकडे सध्याच्या परिस्थितीत तरुण मुलं आपल्यावर विनाकारण कोणत्याही केसेस ओढावून घेण्यासाठी इच्छुक नाहीत. जर मशिदीवरील भोंग्यांसमोर स्पीकर लावले तर त्यातून काही तेढ निर्माण होऊ शकतो आणि या सगळ्याची परिणिती म्हणून सामाजिक वातावरण बिघडू शकतं. या सगळ्याचा विचार करुन देखील आता तरुण मुलं राज ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कचरत आहेत.

why raj thackeray hold an immediate public meeting what exactly is going on in mns from loudspeaker issue on mosque
राज ठाकरेंच्या 'उत्तर'सभेचा मार्ग मोकळा, ठाणे पोलिसांनी दिली परवानगी

ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आणि पक्षातील कार्यकर्त्यांपर्यंत योग्य तो मेसेज पोहचला पाहिजे यासाठीच राज ठाकरे यांनी तात्काळ दुसरी सभा घेण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत निवडणूक प्रचार वगळता एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी राज ठाकरेंनी अशा पद्धतीने तात्काळ दुसरी सभा घेतली नव्हती. मात्र, आता त्यांना ती सभा घ्यावी लागतेय. त्यामुळे पक्षात सारं काही आलबेल नाही हेच यावरुन आपल्याला दिसून येते.

मात्र, तरीही 9 एप्रिलच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार आणि त्यांची भूमिका काय असणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

Related Stories

No stories found.