Twitter India : कायदे मंत्र्यांप्रमाणेच तुमचंही ट्विटर अकाऊंट होऊ शकतं का लॉक? समजून घ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एखाद्या देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कुणाचं असतं? तिथल्या यंत्रणांचं असतंच पण त्याची जबाबदारी अखेर येते ती कायदे मंत्र्यावर. मात्र भारतात कायदेमंत्र्यांनीच कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. हो….आपण भारताचे कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याविषयीच बोलतोय… 25 जूनला रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलं. पण रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर केलेल्या एका ट्विटमुळे असं काय घडलं? की ट्विटरला एका देशाच्या मंत्र्यांचं अकाऊंट लॉक करण्याची वेळ आली? हेच आज समजून घेऊयात.

2017 मध्ये रविशंकर प्रसाद यांनी 1971 च्या युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैनिकांप्रति एक व्हीडिओ पोस्ट केला, ज्यात माँ तुझे सलाम हे संगीतकार A R Rehman चं गाणं वापरण्यात आलेलं.

पण याच गाण्यावर कॉपीराईट क्लेम करत IFPI म्हणजेच इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द फोनोग्राफीक इंडस्ट्रीने ट्विटरकडे तक्रार केली आणि त्यानंतर रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट एक तासासाठी लॉक करण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता ही कारवाई करण्यामागचं कारण आहे ट्विटरची एक पॉलिसी. ट्विटर ही अमेरिकन कंपनी आहे. त्यामुळे US डिजिटल मिलेनिअम कॉपीराईट अक्टनुसार ही कारवाई करण्यात आली. कॉपीराईट म्हणजे काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर एखादी गोष्टी एखाद्या व्यक्तीने तयार केलेली असते, तर ती गोष्ट कुणीही दुसरं कॉपी करू शकत नाही. विनापरवानगी ती गोष्ट वापरण्यात आली तर कॉपीराईट क्लेम केला जातो, आणि त्यानुसार कारवाई होते.

ADVERTISEMENT

रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटमध्ये वापरण्यात आलेलं माँ तुझे सलाम हे गाणं तयार केलेलं सोनी म्युझिक एंटरटेंन्मेंटने…पण त्यांच्या वतीने कॉपीराईटच्या कायद्यानुसार इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द फोनोग्राफीक इंडस्ट्रीने ट्विटरकड़े तक्रार केली.

ADVERTISEMENT

त्यानंतर ट्विटरने 25 जूनला रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट लॉक केलं. 25 जूनला जेव्हा रविशंकर प्रसाद यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा त्यांचं ट्विटर अकाऊंट लॉग ईन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते होतच नव्हतं. पण प्रसाद यांच्या फॉलोअर्ससह इतरांना हे अकाऊंट दिसत होतं. म्हणजेच प्रसाद स्वत:च अकाऊंट उघडून पाहू शकत नव्हते, किंवा काही कॉन्टेंट पोस्ट करू शकत नव्हते, पण तुमच्या-आमच्यासारख्या व्यक्ती त्यांचं अकाऊंट पाहू शकत होते, कारण ट्विटरने हे अकाऊंट केवळ काही काळासाठी लॉक केलेलं, सस्पेंड म्हणजेच रद्द केलं नव्हतं.

हा प्रकार लक्षात येताच प्रसाद यांनी कू या ट्विटरसारख्याच भारतीय बनावटीच्या अपवर माहिती दिली. की US डिजिटल मिलेनिअम कॉपीराईट अक्टच्या उल्लंघनाच्या आरोपामुळे माझं अकाऊंट ट्विटरने लॉक केलं आहे. ट्विटरवरही प्रसाद यांनी ही माहिती टाकलीच, पण त्याच्याही पुढे जाऊन ट्विटरवर आरोपींची सरबत्ती केली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ट्विटर पुरस्कर्ता नाही, अजेंडा घेऊन ट्विटरचं काम चालतं, अशाप्रकारे कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर आरोप केले.

समजून घ्या : Twitter India आणि मोदी सरकारमध्ये नेमका वाद काय? का दाखल झाला FIR?

तासाभराने जेव्हा ट्विटरचं अकाउंट सुरू झालं, तेव्हाही ट्विटरने प्रसाद यांना वॉर्निंग दिली की अकाऊंटवरून पुन्हा अशाप्रकारे नियमांचं उल्लंघन झालं तर अकाऊंट पुन्हा लॉक होईल, आणि वारंवार उल्लंघन झाल्यास सस्पेंडही होईल.

या सगळ्यात आता कायद्याची भाषा काय बोलतेय ते समजून घेऊयात. जसं आपण मगाशी ट्विटरने सांगितलेला कॉपीराईटचा नियम समजून घेतला, की एकाची गोष्ट दुसरी व्यक्ती पोस्ट करू शकत नाही, तसा आता भारताचा नियम सुद्धा समजून घेतला पाहिजे. कारण हे प्रकरण भारतात घडलंय, तर याला अमेरिकेचा कायदा कशाला असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.

तर 2021 मध्ये केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी जे नवे नियम आणले, ज्याला IT rules असंही आपण म्हणतो, त्याच्या नियम 4 क्लॉस ( 8 ) नुसार ट्विटर एखाद्या अकाऊंटवर कुठली अक्शन घेत असेल, तर त्या अकाऊंट होल्डरला तशी माहिती देणं, नोटीस देणं सक्तीचं आहे. का त्या अकाऊंटवर तशी कारवाई केली जाते? त्याची ओरिजिनल पोस्ट कुठे आहे, ही सगळी माहिती अक्शन घेण्यापूर्वीच ट्विटरने अकाऊंट होल्डरला देणं गरजेचं आहे. पण रविशंकर प्रसाद यांच्या केसमध्ये ट्विटरने या नियमांचं पालन न केल्याचा दावा प्रसाद यांनी केलाय.

सोशल मीडियासंदर्भात भारत सरकारने तयार केलेल्या नव्या नियमावरून ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या महिन्याभरापासून वाद सुरू आहे. पण याच वादावर रविशंकर प्रसाद काही न्यूज चॅनेल्सवर बोलले होते. त्या मुलाखतींच्या व्हीडिओवरही कॉपीराईट आल्याचं कळतंय…त्यावरही रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत, की आजवर अशा अनेक मुलाखतींच्या क्लिप्स आम्ही सोशल मीडियावर शेअर केल्यात, पण त्यावर कधी अशी कारवाई झाली नाही.

आता जसा रविशंकर प्रसाद यांच्या बाबतीत घडलं, तसाही काहीसा प्रकार काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या बाबतीतही घडला. कॉपीराईटच्याच मुद्द्यावरून शशी थरूर यांचं अकाऊंट 25 जूनलाच लॉक करण्यात आलेलं. रविशंकर प्रसाद यांच्याच एका ट्विटला कोट करून शशी थरूर यांनीही ट्विटरच्या ही कारवाई मूर्खपणाची असल्याचं म्हटलं. शशी थरूर हे IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनाही असा अनुभव आला आहे. टीव्हीवर न्यूज चॅनेलच्या एका चर्चेचा व्हीडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकल्याने त्यांचं अकाउंट लॉक झालेलं. तो व्हीडीओ त्यांनी हटवल्यानंतर चतुर्वेदी यांचं अकाऊंट पुन्हा सुरू झालं.

पण या सगळ्या वादावर ट्विटरचं म्हणणं आहे की, प्रत्येक गोष्टीवरच कॉपीराईट येतो असं नाहीये. काही गोष्टी या लोकांना माहिती देण्यासाठी असतात, काही राजकीय नेत्यांची भाषणं असतात, अशा गोष्टींचा कमर्शलाईज म्हणजेय व्यावहारिक दृष्ट्या वापर होणार नसेल तर त्यात कॉपीराईट येत नाही.

कॉपीराईटची पॉलिसी ही सगळ्याच ठिकाणी असते. फेसबूक आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरही गाणी असणारे व्हीडिओज टाकले जातात, पण या प्लॅटफॉर्म्सकडे म्युझिकचा लायसेन्स आहे, जो ट्विटरकडे नाही. रविशंकर प्रसाद यांनी माँ तुझे सलाम गाण्यावरील जो व्हीडिओ पोस्ट केलेला तो ट्विटरसह फेसबूकसारख्या इतर सोशल मीडियावरही टाकण्यात आलेला पण तिथे कारवाई झाली नाही. कारवाई फक्त ट्विटरवरच्या व्हीडिओवर झाली. कारण ट्विटरकडे म्युझिक लायसन्स नाही.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर अनेकदा वादात सापडतंय. नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उपराष्ट्रपती व्येंकय्या नायडू यांच्या नावासमोरील ब्लू टीक काही वेळापुरता हटवलेलं. त्याशिवाय नायजेरियाचे राष्ट्रपती मुहमड्डू बुहारी यांचंही अकाऊंट ट्विटरने बॅन केलेलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT