लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणाली पळून जाणार; 12 वर्षांनी 3 मुलांना सोडून प्रियकरासोबत फरार

चंद्रपूर जिल्ह्यातील घटना : पतीने मांडली व्यथा, 5 तोळे सोने, २० तोळे चांदीचे दागिने व एक लाखांसह केला पोबारा
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणाली पळून जाणार; 12 वर्षांनी 3 मुलांना सोडून प्रियकरासोबत फरार
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील घटना

-विकास राजूरकर, चंद्रपूर

तीन मुलं झाल्यानंतर महिला प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे उघडकीस आली आहे. पत्नी पीडित पतीने पत्रकार परिषद घेऊन सगळी घटना सांगत पत्नी 5 तोळे सोने, २० तोळे चांदीचे दागिने व एक लाख रुपये घेऊन गेली असल्याचा आरोप केला आहे.

चिमूर तालुक्यात असलेल्या भिसी येथील वामन मेश्राम यांचा 2009 मध्ये नागपूर जिल्ह्यातील भिवापुर तालुक्यातील नांद गावातील शोभाबाई चाचरकर यांची मुलगी निकिता हिच्याशी विवाह झाला होता. हा विवाह तिची आत्या ललिता डाहारे (रा. किरमिटी मेंढा) यांच्या घरी झाला होता.

लग्नानंतर दिली पळून जाण्याची धमकी

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी निकिताने पतिला (वामन मेश्राम) 'माझे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे, मी तुझ्यासोबत राहणार नाही', अशी धमकी दिली होती. हे ऐकल्यानंतर वामन मेश्राम यांनी सदर माहिती निकिताच्या आई व नातेवाईकांना दिली. त्यावर बैठक घेऊन निकीता यापुढे असं करणार नाही, असं बॉण्ड पेपरवर लिहून घेऊन समज देण्यात आली.

आईवडिलांवरून कुरबुरी...

वामन-निकीता यांचा 12 वर्षांपासून असाच कुरबुरीत संसार सुरू होता. 'तुझे आईवडिल घरी नकोत', असं म्हणून निकीता आईवडिलांना मारहाण करायची. त्यांना जेवण देत नव्हती. त्याचबरोबर घर स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी करत होती. इतकंच नाही, तर प्रियकराला घरी येण्यास नकार दिल्यास हुंडाबळी प्रकरणात अडकवणार, प्रियकरासोबत मिळून जिवे मारणार अशा धमक्या द्यायची, असा आरोप पत्नीपीडित पुरुषाने केला आहे.

12 वर्षाच्या संसारात त्यांना एक मुलगा व २ मूली अशी अपत्य झाली. 11 वर्षाचा मुलगा, तर 9 व 7 वर्षाच्या दोन मुली अशी त्यांना अपत्य आहेत. दरम्यान, 27 ऑगस्ट 2021 रोजी निकिताने तीन मुलं नवऱ्याजवळ सोडून प्रियकरासोबत पळून गेली. जाताना घरातील 5 तोळे सोने, 20 तोळे चांदीचे दागिणे व एक लाख रोकड घेऊन गेल्याचा आरोप वामन मेश्राम यांनी केला आहे.

'महिला आयोगाप्रमाणेच पुरूष आयोग स्थापन करा'

महिलांच्या समस्यांसंदर्भात महिला आयोग आहे. त्याचप्रमाणे पुरुष आयोगही स्थापन करण्यात यावा, अशी मागणी वामन मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. पुरूष आयोगामुळे पत्नी पीडित पुरुषांनाही न्याय मिळेल, असं मेश्राम यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in