वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे मुंबई लोकल बंद होणार का? आयुक्त इकबाल चहल म्हणाले...

जाणून घ्या काय म्हटलं आहे इकबाल सिंह चहल यांनी?
मुंबई लोकल
मुंबई लोकलAaj Tak

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या रोज वाढते आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्णही मुंबईत आहेत. महाराष्ट्रातल्या कोरोना रूग्णांच्या तुलनेत मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे. तसंच मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा देखील 18 टक्क्यांच्यावर गेला आहे. अशात आता चर्चा सुरू झाली आहे की मुंबईत लॉकडाऊन लागणार का? जर कठोर निर्बंध लागले तर काय काय बंद होणार? मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा पुन्हा बंद होणार का? याबाबत उत्तरं दिली आहेत ती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी.

मुंबई लोकल
कोरोना रूग्ण वाढल्याने महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर

काय म्हणाले इकबाल सिंह चहल?

'मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मंगळवारचा विचार केला तर लक्षात येईल की 10 हजारांपेक्षा जास्त रूग्णवाढ झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 डिसेंबरला एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला टास्क फोर्स, वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभाग असे सगळेच होते. तिथे हा मुद्दा मी नमूद केला होता की पॉझिटिव्हिटी रेट हा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन लावण्यासाठीचा मापदंड होता. आता तिसरी लाट थोडी वेगळी आहे. तिसऱ्या लाटेत हा मापदंड न वापरता आपण दोन नवे मापदंड वापरायचे. पहिला मापदंड हा की किती टक्के बेड भरले आहेत? किती टक्के रिकामे आहेत? ती स्थिती समाधानकारक असेल तर लॉकडाऊनची गरज नाही. दुसरा मापदंड हा सांगितला की ऑक्सिजनचा वापर आपल्याला किती करावा लागतो आहे? त्यावर हे ठरवता येईल हे मी त्या बैठकीत सांगितलं होतं.'

Photo - Aaj Tak

'मुंबईची लोकल बंद करण्याचा किंवा कठोर लॉकडाऊन लावण्याचा आमचा तुर्तास तरी विचार नाही. तिसऱ्या लाटेत परिस्थिती वेगळी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी मांडलेले मापदंड मान्य केले. तसंच आपण गर्दी टाळण्यासाठी उपाय योजले आहेत. न्यू इयर पार्टीवर बंदी आपण घातली. 3 तारखेला आपण पहिली ते आठवीच्या शाळा बंद केल्या. कारण जी मुलं आहेत या वयोगटातली त्यांना लस देण्यात आलेली नाही. 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांना लस देणं हे आमचं लक्ष्य आहे. लोकल ट्रेन्स किंवा पब्लिक ट्रानस्पोर्ट बंद करण्याचा आज तरी विचार नाही.'

'मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की लॉकडाऊन लावायचं की नाही हे लोकांच्या हातात आहे. जर लोकांनी कोरोनाची बंधनं पाळली, मास्क लावले, कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाय योजले, गर्दी टाळली तर लॉकडाऊन लागणार नाही. लोकांनी सहकार्य केलं तर आपल्याला निर्बंधांची गरजही भासणार नाही. ओमिक्रॉनला कमी समजण्याची चूक आपल्याला करता येणार नाही हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे' असंही चहल यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in