सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग, १८ पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापुरातील अठरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग, १८ पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापुरातील अठरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. याबाबत त्यांनी शासकीय विश्रामगृहात येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. सोलापुरातील एकनाथ शिंदे गटाचे नेते मनीष काळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नव्याने शिंदे गटात दाखल झालेले सागर शितोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्यासह अठरा पदाधिकाऱ्यांनी रामराम ढोकल्याचे जाहीर केले.

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदारांना घेऊन शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार येऊन आता २ महिने होत आहेत. या दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी सपोर्ट केला आहे. त्याचबरोबर १२ खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. आता सोलापुरातील हा पहिलाच पक्षप्रवेश आहे ज्यामध्ये शिवसेना सोडून बाहेरच्या पक्षातील लोक एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करु लागले आहेत. सोलापूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे हा राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काय म्हणाले पदाधिकारी?

मी आणि माझे सर्व सहकारी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत होतो. ज्या विरोधात होतो, त्यावेळी आंदोलन मोर्चे करण्यासाठी आम्ही पुढे होतो. पण, सत्ता आल्यानंतर पालकमंत्री बाहेरचा नेमण्यात आला. त्यांचे नाव मामा असल्याने अनेक भाचे मलिदा खाण्यासाठी पक्षात आले. पक्ष विरोधात असताना ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष जगवला त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोणत्याही कमिट्या नेमण्यात आलेल्या नाहीत. क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम डावलण्यात आलेले आहे असा प्रश्न सागर शितोळे यांनी विचारला आहे.

शिंदे गटाचा निर्णय अद्यापही कोर्टात

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशी लढाई सुप्रिम कोर्टात एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूला गटामध्ये जोरदार प्रवेश सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील सध्या शिंदे गटामध्ये आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दत्तामामा भरणे हे सोलापुरचे पालकमंत्री होते. आणि नेमके त्यांच्यावरच आरोप करत पदाधिकारी पक्षातून बाहेर पडल्याचं दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in