महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण काळाच्या पडद्याआड, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या आक्रमक शैलीने ठसा उमटवणाऱ्या माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांचे आज (20 डिसेंबर) मुंबईत राहत्या घरी निधन झालं.
ADVERTISEMENT

मुंबई: ज्येष्ठ काँग्रेस नेत्या, माजी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे आज (20 डिसेंबर) निधन झाले. शालिनीताई या 1980 च्या दशकात काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होत्या आणि महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वृद्धापकाळाने संबंधित आजार असल्याचे सांगितले जात आहे.
शालिनीताई पाटील: राजकारणातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
शालिनीताई पाटील या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मजबूत आणि स्पष्टवक्त्या नेत्या होत्या. त्या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते होते. शालिनीताईंनी स्वतःच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सातारा जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली होती. नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला विभागाच्या अध्यक्ष झालेल्या.
हे ही वाचा>> ‘पाठीत खंजीर खुपसण्याचा अनुभव शरद पवारांना आला असेल’, डॉ. शालिनीताई पाटील यांची टीका
1980 च्या दशकात त्या काँग्रेस सरकारमध्ये मंत्री झाल्या आणि महसूल विभागासह इतर महत्त्वपूर्ण खाती सांभाळली. शालिनीताई या मराठा समाजाच्या हक्कांसाठी आणि महिलांच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही होत्या. त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही स्पष्ट भूमिका घेतली होती.
शालिनीताई या विधवा पुनर्विवाह मोहिमेच्या समर्थक होत्या आणि वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांनी कायद्याने विवाह केला होता. राजकारणात त्या नेहमी स्पष्टवक्त्या आणि धाडसी निर्णय घेणाऱ्या नेत्या म्हणून प्रसिद्ध होत्या.










