
आजपासून महाराष्ट्र विधी मंडळात अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 2019 सालच्या निवडणुकानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. त्यादरम्यान भाजप अडीच वर्ष विरोधी बाकावर बसलं होतं. मात्र, शिंदेंच्या बंडानंतर शिंदे गट आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जे सत्ताधारी बाकांवर बसले होते ते आता विरोधी बाकांवर बसले आहेत.
विरोधी बाकांवर -
पहिली रांग : नरहरी झिरवळ, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजय चौधरी, आदित्य ठाकरे
दुसरी रांग : हसन मुश्रीफ, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, नाना पटोले, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, रवींद्र वायकर.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून शिवसेनेत दोन गट पडलेत. अधिवेशन जाहीर झाल्यापासून ही चर्चा होती की शिवसेनेत दोन गट पडलेत त्यातले ठाकरे गटाचे आमदार कुठे बसणार?. त्यात आदित्य ठाकरे यांनी आम्ही विरोधी बाकावर बसणार असल्याचं सांगितलं आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंना पत्र पाठवून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानासाठी निमंत्रण दिलं होतं.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनात शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार हे देखील स्पष्ट नाही. मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले की, त्यांच्या कार्यालयाला अद्याप स्वतंत्र गट स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पूर्वीच्या नोंदीनुसार 55 आमदारांच्या घरात फक्त एकच शिवसेना अस्तित्वात आहे याचा विचार ते करतील, असं ते म्हणाले होते.
यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी काहीही म्हटलं तरीही त्यांची नेमणूक घटनाबाह्य आहे. लोकशाहीची हत्या करून बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यात आलं आहे. आमदार सुनील प्रभू यांनी जारी केलेला शिवसेनेचा व्हीप लागू असून विधानसभेतील पक्ष कार्यालयावर आमचा दावा आहे.
सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसणारे शिवसेना नसून गद्दार आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे आपल्या आमदारांच्या गटासह विधानसभेच्या पायर्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या आंदोलनात सामील झाले. त्यांनी एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करत 'ईडी सरकार'च्या घोषणा दिल्या.