ऋतुजा लटकेंना उमेदवारी मिळू नये म्हणून उद्धव ठाकरेंचं कटकारस्थान? प्रसाद लाडांचे तीन सवाल

Andheri by poll : ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा पेच राजीनाम्यामुळे फसलाय आणि त्याचा ठपका ठाकरे गटाने शिंदे गटावर ठेवलाय...
ऋतुजा लटकेंना उमेदवारी मिळू नये म्हणून उद्धव ठाकरेंचं कटकारस्थान? प्रसाद लाडांचे तीन सवाल

रमेश लटकेच्या निधनानं रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. याच निवडणुकीवरून ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप आमने सामने आलेत. ठाकरेंनी रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. पण, त्यांच्या नोकरीचा राजीनामाच स्वीकारला गेला नसल्यानं ठाकरेंसमोर पेच उभा ठाकलाय. याचा ठपका शिंदे गटावर फोडण्यात आल्यानंतर भाजपनं उलट सवाल केलेत. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी काही सवाल उपस्थित करत या स्थितीला उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलंय.

ऋतुजा लटकेंनी मुंबई महापालिकेतल्या नोकरीचा राजीनामा दिलाय. पण, तो स्वीकारला गेलेला नाही. ठाकरे गटाने यासाठी शिंदे गटाला जबाबदार धरलंय. ऋतुजा लटकेंनी शिंदे गटात जावं म्हणून दबाव टाकला जातोय, असा थेट आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपाला भाजपच्या प्रसाद लाडांनी उत्तर दिलंय.

प्रसाद लाड म्हणतात, "ऋतुजा लटके वहिनींच्या उमेदवारीच्या बाबतीत 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे शिवसैनिकांची आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताहेत. माझे दोन ते तीन प्रश्न उद्धव ठाकरेंना आहेत. ऋतुजा लटकेंना तिकीट द्यायचं होतं, तर तिकीट द्यायला इतका उशीर का केला? याचं उत्तर शिवसेनेच्या नेतृत्वानं द्यावं. शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये उमेदवारी देण्यावरून असलेले मतभेद यावरून निश्चित होतात", असं म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंनाच या परिस्थितीला जबाबदार धरलंय.

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर प्रसाद लाड म्हणाले, "महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असल्यानंतर महापालिकेचे नियम काय? आणि महापालिका कशी चालते हे आम्ही त्यांना सांगायची गरज नव्हती. तरीदेखील मुद्दाम त्यांना राजीनामा द्यायला उशीर करायला लावला. दोन वेगवेगळे राजीनामे द्यायला लावले. यामध्ये कुणाचा हात होता? कुणाचं षडयंत्र होतं? कुणाला कुणाला तिकीट द्यायचं होतं? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे", असं आव्हान प्रसाद लाड यांनी ठाकरेंना दिलंय.

"प्रत्येकवेळी कुठलीही गोष्ट घडल्यानंतर भाजप किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बंद केलं पाहिजे. मला वाटतं यामध्ये शिवसेनेचंच षडयंत्र आहे. कटकारस्थान आहे. आपल्याला कार्यकर्त्यांना कुठेतरी डावलायचं. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा, हे वेळोवेळी होतं म्हणून हे जे नाट्य घडलं, हे जे गंडातर घडलं, त्यामुळेच घडलं. उद्धव ठाकरे हे ऋतुजा लटके यांना उमेदवारी न देण्याला जबाबदार आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे", असं सांगत प्रसाद लाडांनी ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीवरून जो पेच निर्माण झालाय त्याला ठाकरेच जबाबदार असल्याचा दावा केलाय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in