मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंना दिलं चहापानाचं निमंत्रण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंना पत्र पाठवून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानासाठी निमंत्रण दिलं आहे. पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून सुरू होतं आहे. त्या पार्श्वभूमीवर हे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना चहापानासाठी हे पत्र पाठवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात काय म्हटलं आहे? महाराष्ट्र […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंना पत्र पाठवून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानासाठी निमंत्रण दिलं आहे. पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून सुरू होतं आहे. त्या पार्श्वभूमीवर हे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना चहापानासाठी हे पत्र पाठवण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात काय म्हटलं आहे?
महाराष्ट्र विधान मंडळाचे २०२२ चं पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून मुंबईत सुरू होत आहे. महाराष्ट्र विधानमंडळासा एक गौरवशाली परंपरा लाभली आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याबरोबर अनौपचारिक, मनमोकळी आणि सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा व्हावी या हेतूने आपणास अगत्यपूर्वक या चहापान कार्यक्रमासाठी निमंत्रित करत आहे. या चहापानाच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
असं म्हणत सुनील प्रभूंना हे निमंत्रण देण्यात आलं आहे. या पत्राची चर्चा चांगलीच रंगली आहे. राज्यात २१ जूनला राजकीय भूकंप झाला. सत्तेत असलेल्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे मोठी फूट पडली. ज्यानंतर उद्धव ठाकरे यांना २९ जूनला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद मिळवलं. या मंत्रिमंडळाचा विस्तारही नुकताच झाला आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पार पडलं आहे. कोरोना काळ संपल्यानंतर राज्यात होणारं हे पहिलं मोठं अधिवेशन असणार आहे. याआधी महाविकास आघाडीच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या आरोपांची मालिका गाजली. तसंच महाविकास आघाडीने भाजपच्या १२ आमदारांचं केलेलं निलंबनही गाजलं. आता या पावसाळी अधिवेशात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.