CM शिंदे अन् MIDC ने पत्र लिहिली, मग वेदांताचा प्रकल्प गुजरातला कोणामुळे गेला?

CM शिंदे अन् MIDC ने अग्रवाल यांना लिहिलेली पत्र 'मुंबई तक'च्या हाती
Vedanta
Vedanta Mumbai Tak

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनवरुन सुरु झालेला राज्यातील राज्यातील सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद 5 दिवसानंतरही कायम आहे. 3 महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने काहीच प्रयत्न न केल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा आरोप होत आहे. यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही ठपका ठेवण्यात येत आहे. त्याला सत्ताधाऱ्यांकडूनही नुकतेच सत्तेबाहेर गेलेल्या महाविकास आघाडीला प्रत्यूत्तर देण्यात येत आहे.

मात्र याच सर्व गदारोळात आता एकनाथ शिंदे यांनी 26 जुलै 2022 रोजी वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीनेही 5 सप्टेंबर 2022 रोजी अग्रवाल यांना लिहिलेले पत्र 'मुंबई तक'च्या हाती लागले आहे.

नेमके काय आहे या पत्रांमध्ये?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 26 जुलै 2022 रोजी जे पत्र अनिल अग्रवाल यांना लिहिले होते, त्यात अग्रवाल यांनी राज्यात तळेगावमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याआधी महाराष्ट्र सरकारकडे 2 प्रमुख मागण्या केल्याचा उल्लेख आहे. यामध्ये या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि केंद्र सरकारशी समन्वय या दोन गोष्टींचा उल्लेख आहे.

या पत्रानुसार एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही मागण्यांवर अग्रवाल यांना उत्तर देताना म्हटले की, समूहाच्या दोन्ही मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक दिशेने विचार करत आहे. याविषयी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून त्या समितीने समुहाला देण्यात येणाऱ्या पॅकेजला प्राथमिक मान्यता दिली आहे. त्यानंतर याआधारे राज्य मंत्रिमंडळाचीही तातडीने मंजुरी घेण्यात येईल. ,असे आश्वासन शिंदे यांनी दिले होते.

याशिवाय केंद्र सरकारच्याही संपर्कात असून या प्रकल्पासाठी महाराष्ट्रला पूर्ण पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच या पत्रात 29 जुलै रोजी मुंबईमध्ये एक छोटेखानी पत्रकार परिषद घेवून वेदांना आणि महाराष्ट्र सरकार दरम्यान एक सामंजस्य करार करावा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केलेली दिसून येते.

यानंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीनेही 5 जुलै 2022 रोजी अग्रवाल यांना लिहिलेले पत्र 'मुंबई तक'च्या हाती लागले आहे. या पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांच्या 26 जुलैच्या पत्राचा आणि 29 जुलै रोजी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा उल्लेख आहे. या दोन्हीते संदर्भ देवून एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगम यांनी अग्रवाल यांना लिखित ऑफर दिल्याचा उल्लेख आहे.

यात सवलतीच्या दरात 24 तास उच्चदाब क्षमेतेने वीज, तळेगांवमध्ये जमीन, 24 तास मुबलक पाणी, कुशल मनुष्यबळ अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. यातही सामंजस्य करार कधी आणि कुठे करायचा याबाबत वेदांताने कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता या दोन्ही पत्रांनंतरही वेदांताने गुजरातचा मार्ग का निवडला, वेदांताचा हा प्रकल्प कोणामुळे गुजरातला गेला असा सवाल उपस्थित होवू आहे.

पंतप्रधान मोदी - अग्रवाल यांची 5 सप्टेंबरला झाली होती भेट :

या प्रकल्पाबाबत सप्टेंबर महिन्यांमध्ये वेगवान घडामोडी घडल्या. यात 5 सप्टेंबर रोजी अनिल अग्रवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यानंतर १३ सप्टेंबर रोजी अनिल अग्रवाल यांनी थेट वेदांताची गुंतवणूक गुजरातमध्ये करत असल्याची घोषणा केली. या घटनाक्रमानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रात वेदांताचा प्रकल्प येवू दिला नाही का? केंद्राने परस्पर हा प्रकल्प गुजरातकडे वळविला का? असे सवाल विचारले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in