देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील खंत नकळतपणे आली समोर? पुण्यातल्या वक्तव्याची चर्चा

पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे? जाणून घ्या
Devendra Fadnavis's regret came out unknowingly? Discussion of the statement in Pune
Devendra Fadnavis's regret came out unknowingly? Discussion of the statement in Pune

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात हर घर तिरंगा युवा संकल्प अभियनाच्या प्रसंगी उपस्थिती लावली होती. यावेळी विद्यापीठाने केलेल्या रेकॉर्डचं त्यांनी कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे त्यांच्या मनातली खंत नकळतपणे समोर आली का? ही चर्चा आता सुरू झाली आहे.

नेमकं पुण्यातल्या कार्यक्रमात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"पहिला रेकॉर्ड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला तेव्हा मला आमंत्रित केलं होतं मी मुख्यमंत्री होतो. आज दुसरा रेकॉर्ड केला आणि मुख्यमंत्री आहे. तिसरा रेकॉर्ड तुम्ही कराल तेव्हा मात्र मी येणार नाही"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मात्र नंतर ही चर्चाही सुरू झाली आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पुन्हा मुख्यमंत्री न झाल्याची खंत समोर आल्याची चर्चा आहे. २१ जूनला राज्यात जो राजकीय भूकंप झाला तो देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच झाला.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. आधी सुरतला आणि मग गुवाहाटीला गेले. त्यांनी शिवसेना सोडली नसली तरही त्यांनी जे बंड केलं त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले.

महाराष्ट्रात असलेलं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या सगळ्या परिस्थितीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा कयास सगळेच राजकीय तज्ज्ञ लावत होते. एवढंच काय मी पुन्हा येईन ही त्यांची कविताही ३० जूनच्या सकाळपासून व्हायरल होत होती.

मात्र प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन जी पत्रकार परिषद घेतली त्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होतील असं सांगितलं. तसंच आपण सत्तेबाहेर राहणार आहोत असंही स्पष्ट केलं. मात्र त्यानंतर अवघ्या तासाभरात दिल्लीतून सूत्रं हलली आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये सहभागी होण्याचा आदेश देण्यात आला. तसंच त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सांगण्यात आलं.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील ही चर्चा असतानाच त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेला हा धक्का तंत्राचा वापर महाराष्ट्र भाजपसाठी धक्काच होता. अशात आता पुण्यातल्या कार्यक्रमात बोलत असताना जे देवेंद्र फडणवीस बोलले त्यामुळे त्यांच्या मनातली खंत समोर आल्याची चर्चा रंगली आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी भाषणात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या शेवटी मात्र हे सांगितलं की, पुढच्या वेळेस कुठला ही रेकॉर्ड SPPU ने बनवला , आणि मला बोलवलं आणि मी कुठल्याही पदावर असलो तरीही मी येईन असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in