सासूच्या निधनाची बातमी समजताच सूनेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने सर्वत्र हळहळ
Chhatrapati Sambhaji Nagar News : सासूच्या निधनाची बातमी समजताच सूनेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, छत्रपती संभाजीनगर घटनेने सर्वत्र हळहळ
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सासूच्या निधनाची बातमी समजताच सूनेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू,
छत्रपती संभाजीनगर घटनेने सर्वत्र हळहळ
छत्रपती संभाजीनगर : शहरातील वेदांतनगर भागात घडलेल्या एक हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या वृद्ध सासूच्या निधनाची बातमी समजताच तिच्या सुनेलाही हृदयविकाराचा झटका आला आणि उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परदेशी कुटुंबावर दुहेरी शोककळा पसरली आहे.
अधिकची माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी हे आपल्या आई व पत्नीसमवेत वेदांतनगर परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आई रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) या दीपावलीच्या सुट्टीत नाशिक येथे आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेल्या होत्या. मंगळवारी दुपारी नाशिकहून त्यांच्या निधनाची बातमी मिळताच घरात शोककळा पसरली. आईच्या निधनाचे वृत्त ऐकताच सुरेश परदेशी आपल्या कुटुंबासह नाशिकला जाण्याची तयारी करत होते. त्याचवेळी त्यांच्या पत्नी विजया सुरेश परदेशी (वय 62) यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना घाटी रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
एका दिवसात सासू आणि सुनेच्या अशा दुहेरी मृत्यूमुळे परदेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, “अशा दु:खद योगायोगाने मन हेलावून जाते,” अशा प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे. रुक्मिणीबाई परदेशी यांच्या निधनानंतर रात्री उशिरा नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.










