काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

सलग 9 वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान
Manikrao Gavit
Manikrao Gavit Mumbai Tak

नाशिक : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी (आज) उपचारादरम्यान सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.

सलग 9 वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान गावित यांनी मिळविला होता. या दरम्यान गावित यांनी 2 वेळा केंद्रीय मंत्री, संसदेच्या विविध समित्यांचे अध्यक्षपद, सदस्य, महामंडळाचे अध्यक्षपद, लोकसभेच्या प्रभारी अध्यक्षपदाचीही जबाबदारी त्यांनी स्वीकारली. दांडगा जनसंपर्क असलेला नेता माणिकराव गावित यांना ओळखले जायचे.

माणिकराव गावित यांची राजकीय कारकीर्द :

धुळीपाडा ता. नवापूर येथील एका गरीब आदिवासी कुटुंबात 1934 रोजी त्यांचा जन्म झाला. 1965 साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले व तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. तत्कालीन मोठ्या काँग्रेस नेत्यांच्या सभांचे आयोजन करणे, सभेशी संबंधित इतर छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणे अशी काम ते करायचे. त्यानंतर 1971 साली ते धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातुन सदस्य म्हणून निवडून आले. १९७१ ते १९७८ या काळात माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या सहकाऱ्याने ते धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून निवडून आले.

1978 ते 1984 या काळात ते धुळे जिल्हा इंदिरा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष झाले. या दरम्यान 1980 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत ते नवापूर विधानसभा मतदारसंघातुन प्रचंड मताधिक्याने निवडून आले. मात्र तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या इच्छेनुसार नंदुरबार मतदारसंघाचे खासदार असलेले सुरूपसिंग नाईक यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देवून 1980 साली महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळात जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या 1981 साली माणिकराव गावित प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्याचवेळी गावित यांच्या जागी सुरूपसिंग नाईक बिनविरोध निवडून आले.

1981 ते 2004 हा माणिकराव गावित यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. 1980 ते 1984 या काळात ते महाराष्ट्रच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्षही होते. 2004 साली डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून गावित यांचा समावेश झाला. त्यानंतर 2009 साली 15 व्या लोकसभेच्या प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. 2013 साली त्यांची पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली. मध्यतंरीच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या कॉग्रेस प्रदेश समितीचे उपाध्यक्षपद ही त्यांनी भूषविले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in