
फॉक्सकॉन, वेदांताचा मुद्दा महाविकास आघाडीने उचलून धरला आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्र सरकावर टीका केली आहे. अशात अजित पवार यांनी या प्रकरणी केंद्र सरकारवर आरोप केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा विविध मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात यावेत यासाठी प्रयत्नशील होते.चीनमधले अनेक प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये जाण्यास इच्छुक होते. उद्योग विभागाचे प्रमुख तेव्हा सुभाष देसाई होते. सेमी कंडक्टरचा प्रकल्प हा वेदांताचा आहे. दीड लाख कोटीची गुंतवणूक येणार होती. दोन लाख लोकांना काम मिळणार होतं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
फॉक्सकॉन वेदांताने तळेगावची जागा जवळपास नक्की केली होती. दोन लाख कोटींची साधारण गुंतवणूक होती. त्यावेळी त्या कंपनीने गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमधल्या जागांचे विचार केले. अंतिम जागा तळेगावची निवडली जी महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात आहे. तिथे इलेक्ट्रिक हब, एअर कनेक्टिव्हिटी, जेएनपीटी असं कनेक्ट करून देण्याचं धोरण असल्याने १ हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. एवढी मोठी गुंतवणूक आपल्या राज्यातून जाऊ नये असंच आम्हाला वाटत होतं.
आम्ही मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. इतका मोठा प्रोजेक्ट जाऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. माझ्यासोबत बाळासाहेब थोरात, रोहित पवार तसंच इतर नेतेही होते. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा अशी आमची इच्छा आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर वेदांताचा प्रकल्प इथे आणता येईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आम्ही टोलवाटोलवी करत नाही, त्यांनीही ती करू नये. शेवटी दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. बल्क ड्रगचा प्रकल्प हा गेला असं मी ऐकलं आहे त्याबाबत मी माहिती घेऊन बोलेन. तूर्तास मी त्याची पूर्ण माहिती घेतो आहे त्यासंदर्भातही आम्ही चर्चा करू. महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्यांनी महाराष्ट्राचं हित पाहिलं पाहिजे. कुणाच्याही दबावाला बळी पडू नये असंही आवाहन अजित पवार यांनी म्हटलं आहे.
फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात आला पाहिजे आणि इतर त्यापेक्षा मोठा प्रकल्प येणार असेल तर तोही यावा. आपल्याकडे बेरोजगारी बरीच आहे. त्यांच्या हाताला काम मिळेल. कोणतं राज्य रेड कार्पेट टाकतं ते महत्त्वाचं आहे, जर प्रकल्प आला नाही तर आपणच कमी पडतो असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. फॉक्सकॉनचा प्रकल्प तर यावाच आम्ही स्वागतच करू, पण पंतप्रधान म्हणतात त्यामुळे मोठा प्रकल्प आला तर तोदेखील यावा असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.