Hasan Mushrif यांना अटक होणार? कागलमध्ये वातावरण तापलं : समर्थक आक्रमक

Hasan Mushrif | ED Raid : जवळपास १२ तासांनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचा अद्याप तपास सुरु आहे.
ED Raids at hasan mushrif house in money laundering case
ED Raids at hasan mushrif house in money laundering caseफोटो-फेसबुक

(Hasan Mushrif | ED Raid news)

कोल्हापूर : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरुद्ध ईडीने (ED) कारवाई सुरू केली आहे. आज सकाळी 25 जणांच्या ईडीच्या पथकाने मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर छापा टाकला आहे. त्यानंतर आता जवळपास १२ तासांनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचा अद्याप तपास सुरु आहे.

याचमुळे हसन मुश्रीफ यांना तपासानंतर अटक होणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. दरम्यान, १२ तासांनंतरही ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरात ठाण मांडून आहेत. त्यामुळे सकाळपासून शांत असलेल्या मुश्रीफ समर्थक आता संतप्त झाले असून ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आज कागलमध्ये गैबी चौकात हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचं केलं दहन केलं. तसंच ईडीच्या अधिकाऱ्यांनी इथून लवकरात लवकर जावं अन्यथा इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा दिला आहे.

नेमकं काय प्रकरण?

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुश्रीफ यांच्यावर तब्बल 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. यात त्यांच्यावर प्रामुख्याने अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यासंदर्भातील गैरव्यवहारांचे आरोप आहेत. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात त्यांच्या एका नातेवाईकाच्या मालकीच्या व ताब्यात असलेल्या खासगी कंपनीच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेला आहे.

किरीट सोमय्या यांनी असाही आरोप केला होता की, अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं ताब्यात घेतला होता. या कंपनीचे मालक मुश्रीफांचे नातेवाईक मतीन हसीन मंगोली हे होते. ब्रिक्स इंडियाला कारखाना देताना प्रक्रियेचं पालन केलं गेलं नाही. दुसर्‍या तक्रारीत किरीट सोमय्या यांनी आरोप केलेला होता की, हसन मुश्रीफ हे सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाने 127 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहार आणि मनी लाँडरिंगमध्ये सामील आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in