फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? राज ठाकरेही आक्रमक
फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यानंतर आता साहजिकच शिंदे-फडणवीस सरकारवर टीका झाली आहे. या सरकारने प्रयत्न केले नाहीत म्हणूनच हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर आदित्य ठाकरेंनीही टीका केली आहे. खोके सरकारने महाराष्ट्राला असे धोके देऊ नयेत असं भाष्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे. तर जयंत पाटील, सचिन सावंत अशा […]
ADVERTISEMENT

फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यानंतर आता साहजिकच शिंदे-फडणवीस सरकारवर टीका झाली आहे. या सरकारने प्रयत्न केले नाहीत म्हणूनच हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर आदित्य ठाकरेंनीही टीका केली आहे. खोके सरकारने महाराष्ट्राला असे धोके देऊ नयेत असं भाष्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे. तर जयंत पाटील, सचिन सावंत अशा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही याबाबत सरकारला जबाबदार धरलं आहे. या पाठोपाठ राज ठाकरेही या प्रकरणी आक्रमक झाले आहेत.
फॉक्सकॉन-वेदांताचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार?
काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी?
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार
फॉक्सकॉन आणि वेदांता समुहाकडून भारतात उभारण्यात येणारा सेमीकंडक्टर चिप निर्मिती आणि डिस्प्ले फॅब उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे उभारण्याचे निश्चित झाले होते. मात्र, हा प्रोजेक्ट आता गुजरातमधील अहमदाबाद येथे उभारला जाणार आहे.