शिवसेना फुटत असताना उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या रामदास कदम यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

जाणून घ्या रामदास कदम यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे?
How is the political journey of Ramdas Kadam
How is the political journey of Ramdas Kadam

आज बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ माझ्यावर आली नसती असं म्हणत आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा रामदास कदम यांनी दिला आहे. शिवसेना पक्ष मोठ्या प्रमाणावर फुटीचा सामना करत असतानाच ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामदास कदम हे आता शिंदे गटासोबत गेले आहेत. कारण त्यांनी जी नवी कार्यकारिणी जाहीर केली त्यात रामदास कदम यांचं नाव आहे.

रामदास कदम शिवसेनेसोबत सुमारे चार दशकांहून अधिक काळ कार्यरत

रत्नागिरी येथील खेड मतदार संघातून रामदास कदम निवडून येतात. तरीही त्यांच्य राजकीय कारकिर्दीची सुरूवात मुंबईतल्या कांदिवली या भागातून झाली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा बजाओ पुंगी हटाओ लुंगी हा नारा दिला होता तेव्हा जे आंदोलन उभं राहिलं होतं त्यात रामदास कदम होते.

कांदिवली गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, खेडचे आमदार अशी रामदास कदम यांच्या कारकिर्दीचा आलेख हळू हळू उंचावत गेला. तसंच शिवसेनेचे अत्यंत महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. १९९० मध्ये ते खेड मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९५, १९९९, २००४ या तिन्ही निवडणुका ते सलग जिंकले. १९९५ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं होतं त्या सरकारमध्ये रामदास कदम अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते.

२००५ मध्ये विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची निवड झाली होती. या काळात आघाडी सरकारला त्यांनी जेरीस आणलं होतं. शिवसेनेचे कोकणातले अत्यंत बळकट नेते मानले जाणारे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांची पोकळी भरून काढण्याचं महत्त्वाचं काम रामदास कदम यांनी केलं.

२००९ च्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघातून रामदास कदम पराभूत झाले. त्यावेळी राष्ट्रवादीत असणारे भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना हरवलं होतं. यानंतर रामदास कदम यांना शिवसेनेने विधान परिषदेत पाठवलं होतं. २०१४ लाही त्यांना विधान परिषदेत पाठवलं गेलं होतं. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं.

शिवसेना नेते अनिल परब आणि रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले होते. राजकीय दृष्ट्या मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अनिल परब करत आहेत असा आरोप रामदास कदम यांनी केला होता. तसंच योगेशला म्हणजेच माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदमला घेऊन अनिल परब मातोश्रीवर गेले होते असाही आरोप रामदास कदम यांनी केला होता. एवढंच नाही तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आहेत की अनिल परब आहेत हा प्रश्न पडला आहे इथवर त्यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांना शिवसेनेत साईड ट्रॅक करण्यात आलं होतं. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून ते शांत होते. मात्र आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहोत असं म्हणणाऱ्या शिंदे गटासोबत रामदास कदम गेले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in